अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशीप 

0
506

अविनाश पोईनकर यांना अरुण साधू पत्रकारिता फेलोशीप 

पुणे विद्यापीठ व ग्रंथाली तर्फे जाहीर : विदर्भाला पहिल्यांदाच सन्मान

चंद्रपूर :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, ग्रंथाली प्रकाशन मुंबई व साधू कुटुंबीय यांच्यावतीने दरवर्षी राज्यातील एका पत्रकार किंवा मुक्तपत्रकारांना संशोधनात्मक लेखनासाठी नामांकित कै.अरुण साधू फेलोशीप देण्यात येते. यंदा सन २०२०-२१ वर्षांची ही नामांकित फेलोशीप चंद्रपूरचे मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर यांना जाहीर झाली आहे. विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात ही फेलोशीप पहिल्यांदाच मिळाली आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी या मुळ गावाचे अविनाश पोईनकर सध्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे कार्यरत आहे. ‘आदिम माडीया समाजाचे हक्क व संस्कृतीदर्शन’ या त्यांच्या संशोधनात्मक अभ्यास विषयाची राज्यस्तरावर मुल्यमापन, मुलाखत प्रक्रियेतून निवड करण्यात आली. १ लाख रुपये या फेलोशीपचे स्वरुप असून संशोधनात्मक लेखनाचे नामांकित ग्रंथाली प्रकाशनाकडून पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा अभ्यासक डॉ.गणेश देवी, राज्यसभा सदस्य व जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अरुण साधू स्मृती कार्यक्रमात मुक्तपत्रकार अविनाश पोईनकर यांना ही नामांकित फेलोशीप नुकतीच जाहीर केली आहे. यावेळी पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ.उज्वला बर्वे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, सुवर्णा व शेफाली साधू, पराग करंदीकर, अतुल देऊळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या फेलोशीपची घोषणा करण्यात आली नव्हती. यंदा दोन वर्षाच्या फेलोशीपची घोषणा एकत्र करण्यात आली असून अविनाश पोईनकर यांचेसह मुंबईचे पत्रकार शर्मीष्ठा भोसले व निलेश बुधावले यांना ही फेलोशीप विभागून देण्यात आली आहे.

 

अविनाश पोईनकर हे मुक्तपत्रकारासह कवी, निवेदक व युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचा ‘उजेड मागणारी आसवे’ कवितासंग्रह प्रकाशित आहे. या अगोदर मुख्यमंत्री ग्राम विकास फेलोशिप अंतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. चंद्रपूरातील घाटकुळ ग्रामपंचायतीला राज्यात आदर्श ग्राम व जिल्ह्यात स्मार्ट व सुंदर गाव पुरस्कार मिळवून देत ग्रामीण विकासात उत्कृष्ठ कार्य केले आहेत. विदर्भाच्या पत्रकारिता क्षेत्रात पहिल्यांदाच ही मानाची फेलोशीप जाहीर झाल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.

मागील वर्षभरापासून गडचिरोलीतील भामरागड परिसरात प्रत्यक्ष आदिम माडीया समाजासोबत काम करत असतांना या समृद्ध संस्कृतीचे वैभव अनुभवले. समाजातील सांस्कृतिक, पारंपारिक नोंदी व हक्क या फेलोशीपच्या माध्यमातून सखोल संशोधनात्मक मांडता येईल, याचे अधिक समाधान आहे.

– अविनाश पोईनकर, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here