झरी मार्गवर पुलाच्या निर्मितीची,मागील तीन वर्षापासून ग्रामस्थांना प्रतीक्षा
बांधकाम मंजुरी देण्याबाबत जि. प.बांधकाम विभाग उदासिन
पावसाळ्यात गाव अनेक दिवस असतो संपर्काबाहेर
आशिष गजभिये/चिमूर
ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झरी या गावाला जोडण्यासाठी उमरेड- चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३(ई) या वरून एकमेव रस्ता आहे.या मार्गावर शेत परिसरातून वाहून येणारे पाणी साचत असते या साचलेल्या पाण्यामुळे गावाच्या मुख्य मार्गाला तलावाच स्वरूप प्राप्त होते.परिणामी शाळकरी विद्यार्थी, रुग्ण व ग्रामस्थांना नाइलाजाने मार्गावर साचलेल्या पाण्यातून वाट काढवी लागत आहे.ही समस्या मागील चार वर्षापूर्वीपासून असून या ठिकाणी पूल उभारण्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पूल उभारण्यासंदर्भात ग्रामसभेच्या ठरावासह प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पण या वर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याने या बाबतीत जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन असल्याने आजही ग्रामस्थांना झरी मार्गावर पुलाच्या निर्मितीची प्रतीक्षा आहे.
ग्रामपंचायत बंदर (शिवापूर) अंतर्गत ७०-८०घरांची वस्ती असलेलं आदिवासी बहुल झरी गाव जागतिक कीर्ती असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालागत वसले आहे.या गावावरून व्याघ्र प्रकल्पाचे नवेगाव प्रवेशद्वार हाकेच्या अंतरावर आहे. काही वर्षांपूर्वी या गावाला पक्का डांबरी रस्ता दोन टप्प्यामध्ये निर्माण करण्यात आला. बांधकाम विभागाने रस्ता निर्माण करताना आवश्यक त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली नाही.याच चुकीमुळे झरी मागील चार वर्षांपासून या मार्गाला साचनाऱ्या पाण्यामुळे तलावाच स्वरूप प्राप्त होते.परिणामी मार्ग अनेक दिवस वाहतुकीस बंद राहत असल्याने गाव अनेक दिवस संपर्काच्या बाहेर असते.
या गावच्या ग्रामस्थांनी समस्या उद्भवलेल्या वर्षी ग्रामपंचायत प्रशासनाकडे या समस्येचे निराकरण करण्याविषयी दाद मागितली होती यावर ग्रामपंचाय प्रशासनाने हा विषय दि.०२/१०/२०१८ च्या ग्रामसभेमध्ये ११० सदस्यांच्या उपस्थितीत विषय क्रमांक ६/५ जि. प.रोडवर सिमेंट पाईप रपटा बांधकाम मंजूर करणे बाबत ग्रामसभेत चर्चा करून ठराव मंजूर केला होता. या ठरावाच्या प्रतिसह बांधकाम मंजूर करण्याबाबतच्या निवेदनासह प्रस्ताव उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग यांच्याकडे दि.३०/१०/२०१५ ला सादर केला होता , पण मागील तीन वर्षांच्या काळापासून या ठिकाणची समस्या जैसे थे असल्याने या मार्गावर पूल उभारण्यासंर्भात जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याचे दिसून येते.