घुग्घूस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी
मुस्लिम बांधवानी गळाभेट घेत एकमेकांना दिल्या ईदच्या शुभेच्छा
घुग्घूस : शहरातील मुस्लिम कब्रस्थान परिसरातील ईदगाह येथे आज मुस्लिम समाज बांधवानी सकाळी आठ वाजता बकरी ईद (ईद – उल – अजहा), (ईद – उल – जुहा ) विशेष नमाज अदा करीत गळा भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व कब्रस्थानातील आपल्या मृत पूर्वजाच्या कबरीवर फुलांची चादर चढवीत आशीर्वाद घेतला.
बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे महत्वाचे धार्मिक आणि सामाजिक सण आहे या सणाचा मुख्य उद्देश म्हणजेच पैगंबर हजरत इब्राहिम (अ. स.)यांच्या बलिदानाला स्मरण करणे आणि अल्लाहच्या इच्छेला पूर्णपणे समर्पण करणे आहे.
बकरी ईद मध्ये बकऱ्याची किंवा शासनाने परवानगी दिलेल्या पशुची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव आपल्या प्रिय गोष्टीला अल्लाहसाठी अर्पण करतो हे त्याग आणि समर्पण व भावनांचा प्रतीक आहे.
ईद निमित्त पोलीस प्रशासनाने ईदगाह परिसरात पेंडाल टाकून पोलीस उपनिरीक्षक तायवाडे, व पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज बांधवाना गुलाबाचे फुल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले.