कविसंमेलन !! एक अनुभव !! 

0
448

कविसंमेलन !! एक अनुभव !! 

सिंदेवाही ,चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातील सुपरिचित कवयित्रि तथा सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या भावना खाेब्रागडे यांनी कविसंमेलना बाबत आपला एक अनुभव शब्दांकित केला आहे .ताे येथे देत आहाे ! 

सकाळला जितूचा फोन आला. म्हणाले, “भावनाताई, आज तुम्हाला खेड ला घेऊन जायचे आहे. सरांना सांगितलो मी तसा.” थोडा वेळ काही समजलच नाही. मी म्हटलं, “हो, येणार मी.” फोन ठेवला. पण अख्खा दिवस जणू मी तयारीला लागली होती. की परत मला रत्नागिरीला जायचे आहे. मी पहिल्यांदा रत्नागिरीला गेली ना…त्यावेळी जी हुरहुर, सोहळ्याची आतुरता मनाला भेदणारे नवनवीन काल्पनिक कल्पना मनात घर करुन गेल्या होत्या. त्या पुन्हा एकदा प्रकटल्याचा भास झाला.

मी केलेला दिवस रात्रीचा प्रवास मला पाठमोरी घेऊन जात होता. हाॅटेलात केलेला नास्ता, जेवण जे मला कधीच आवडत नाही. तेही मला त्यावेळी आवडून गेलं होतं. कदाचित पर्याय नसावा दुसरा म्हणूनही असेल. सकाळचे साडेपाच वाजता माझं रत्नागिरीत उतरणं, आॅटोवाल्याशी बोलणं, तेथून पतपेठी हाॅलकडे जाणं, तेथूनच झालेली समुद्र भेट…… पुन्हा तो उधानलेला समुद्र डोळ्यात तरंगत होता. माझ्या सळसळत्या रक्तासमान, डोळ्यातून वाहणार्‍या अश्रूसमान तो आजही वाहत असेल ना….! माझ्या पायाच्या ठस्याला तो स्पर्शून गेला असेल ना….! माझ्या श्वासाच्या वार्‍यात वाफेची आद्रता असेल ना….! तिथे ठेऊन आलेल्या माझ्या भावनिक मनाला तो आजही जपत असेल ना…!असे असंख्य प्रश्न आज मला भेडसावत होते.

सायंकाळ झाली परत तीच तयारी. सगळेच आॅनलाईन आले. जुने चेहरे परत नजरेसमोर आले. पुन्हा सोहळ्यात मी सामिल झाली. तोच आनंद मनात नाचत होता. पतपेठी हाॅलमधला आवाज नव्याने कानी पडत होता. विविध क्षेत्रातील नामवंत, कलावंताचा सत्कार जणू पुन्हा नव्याने होत होता. लोकांच्या चेहर्‍यावरचे हास्य, ह्रदयात असलेली साहित्यिक आत्मियता खर्‍या अर्थाने अवकाशात चकाकत होती. आजही प्रत्येक क्षण हा सोहळ्यासारखाच वाटत आहे.

ह्या आॅनलाईनच्या काळातही तोच उत्साह कदाचित न संपणार्‍या प्रवाहाची वेल आहे ही. चिरतरुन असणार्‍या सौंदर्याचे बीज आहे ही. साहित्य क्षैत्रात मिळणारा आनंद जीवनातल्या कुठल्याही सुखाचे मोल देऊ शकत नाही.

जसा रत्नागिरीचा सोहळा अजरामर राहिला. तसाच खेड तालुक्याचा सोहळा यादगार झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या छाया मॅडम, संस्थापक, मनोज जाधव सर, सुनिल सुरेखा सर, सुरेश कुराडे सर, जितेंद्र मोहिते सर, सुंदर संचालन करणार्‍या रिया पवार आणि आपआपल्या कविता ऐकवणारे साहित्यिक, श्रोते आणि त्यांच्यात असलेली मी……

ह्या सगळ्यांच्या सहवासात माझा श्वास मोकळा होऊन गेला. खुल्या आकाशी स्वैर करुन यावी तसा संपूर्ण बंधनांना मुक्त करुन गेला.

“भावना खोब्रागडे”

सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here