विहिरगाव येथील गटारात घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायतीची उदासीन वृत्ती ठरतेय आरोग्याच्या समस्यांना खुले आमंत्रण

0
560

विहिरगाव येथील गटारात घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायतीची उदासीन वृत्ती ठरतेय आरोग्याच्या समस्यांना खुले आमंत्रण

जनता विविध समस्यांच्या विळखेने त्रस्त

राजुरा, अमोल राऊत (३० एप्रिल) : तालुक्यातील विहिरगाव येथील मागील कित्येक महिन्यांपासून नालीची सफाई करण्यात आली नाही. यामुळे नालीतील सांडपाणी जागेवरच साठत असल्याने डासांचा प्रकोप वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचा रोग बळावण्यास खुले आमंत्रण ठरत आहे. जनता विविध समस्यांच्या विळख्यात सापडली असून यावर ग्रामपंचायतीने लक्ष देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
सध्या संपूर्ण देशात कोरोना महामारीने बरेच थैमान माजवले असतांना ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षतेने गावात स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गावातील जनतेला अपेक्षा असतांना तसे होताना दिसून येत नाही. रात्रपाळीत गटारात धूर सोडण्याच्या मशीनचा वापर होताना दिसून येत नाही. यामुळे नालीतील घाण व कचऱ्याच्या साम्राज्याने डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून साथीचा आजार वाढत आहे. गावात स्थानिक उपकेंद्र कर्मचारी मलेरिया वर्कर सुद्धा भेट देत नसल्याने साथीचा रोगाने ग्रासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी गावकरी करत आहेत.
गावात पशुवैद्यकीय दवाखाना असून वैद्यकीय अधिकारी नाममात्रच आहे. शिवाय गावात ट्रॅक्टर धारक मालकांनी रेती तस्करीचा सपाटा सुरु केल्याने भरधाव वाहनांमुळे गावकऱ्यांना याचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा एक अनेक समस्यांना गावातील जनतेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रशासनाची उदासीनता दिसून येत असल्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच आळा घालण्याची मागणी गावकरी जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here