युवा जोडो अभियानाअंतर्गत “युवा संवाद मेळावा व मुलाखती” संपन्न

0
739

युवा जोडो अभियानाअंतर्गत “युवा संवाद मेळावा व मुलाखती” संपन्न

www.impact24news.com

चंद्रपूर, अमोल राऊत (१६ ऑगस्ट) : देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची ताकद युवा पिढीत असते. युवा वर्गाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणीचा पूर्व विदर्भातील जिल्हा दौरा १४ ते १७ ऑगस्ट पर्यंत नियोजित करण्यात आला आहे. आज चंद्रपूरात या दौरा कार्यक्रमातून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद, त्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. १२ वाजता एन डी हॉटेल येथे युवा सभा घेऊन युवकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी जिल्हा युवा कार्यकारणी नियुक्तीसाठी इच्छुक युवकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

या युवा संवाद मेळाव्याच्या अध्यस्थानी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा तर मार्गदर्शक म्हणून युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे उपस्थित होते. यावेळी मंचावर राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ समन्वयक राजू झोडे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण गावतुरे, समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिला अध्यक्षा कविता गौरकार, शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, शहर महिला अध्यक्षा तनुजा रायपुरे सह आदी पदाधिकारी आसनस्थ होते.

 

उद्योगात स्थानिकांच्या रोजगारासाठी वंचित बहुजन युवा आघाडी मोठे आंदोलन छेडेल… – निलेश विश्वकर्मा
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग, व्यवसाय असून यात परप्रातियांचा मोठा भरणा आहे. मात्र स्थानिक युवकांना रोजगारापासून कोसो दूर राहावे लागत असल्याने बेरोजगारी वाढली आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवा आघाडी प्रामुख्याने मोठे आंदोलन उभे करेल असा इशारा त्यांनी या संवाद सभेत युवकांशी संवाद साधताना प्रशासनाला दिला. राजकारणाची धुरा युवकांनी स्वतःच्या खांद्यावर वाहून राजकारणाला नवी दिशा द्यावी. सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल जनतेला मुख्य प्रवाहात आणून युवकांनी सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या उमेदीच्या युवकांच्या फौज वंचित बहुजन आघाडीचा झेंडा जिल्हाभरात पोहचवून सत्ता बदल निश्चितच करू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

चळवळ मोठी करण्यासाठी सदैव तत्पर युवक – राजेंद्र पातोडे
देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची खरी ताकद युवा वर्गात असल्याने राजकीय चळवळ मोठी करून योग्य मोट बांधण्यासाठी युवा वर्ग सदैव तत्पर असला पाहिजे असे मत यावेळी राजेंद्र पातोडे यांनी युवकांशी संवाद साधताना व्यक्त केले. आपल्या नेत्याच्या आदेशाचे पालन करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिस्तप्रिय युवक नक्कीच करेल. नवीन फळीची वाटचाल शोषित, पीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल. युवक आघाडीची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. सक्षमपणे, निसंदेहपणे युवकांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली पाहिजे याकरिता लवकरच युवा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

बाळासाहेब यांच्या आदेशाला मानणारे सुशिक्षित तरुण युवक हेच वंचित बहुजन आघाडीचे मोठे भांडवल असल्याचे मत संवाद मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या युवा संवाद मेळाव्याचे संचालन जयदीप खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रवीण गावतुरे यांनी तर आभार नितीन रामटेके यांनी मानले. यावेळी या संवाद मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मुलाखत कार्यक्रमाला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here