आम आदमी पक्षाचे सुरज ठाकरे यांच्या उपोषणाची तूर्तास सांगता…

0
262

आम आदमी पक्षाचे सुरज ठाकरे यांच्या उपोषणाची तूर्तास सांगता…

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध जनहितार्थ मागण्यांना घेऊन आम आदमी पक्षातर्फे दिनांक १८/१०/२३ पासून उपोषणास बसलेल्या सुरज ठाकरे यांनी दिनांक २०/१०/२३ रोजी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व सफाई कामगार यांच्या पत्नी सौ. नंदिनी गेडाम यांच्या हस्ते उपोषणाची समाप्ती केली.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या तसेच कामगार व बेरोजगारांच्या समस्या विशेषतः प्रामुख्याने सुरज ठाकरे यांनी उचलून धरल्या होत्या. कामगारांच्या समस्येबाबत तसेच बेरोजगारांच्या समस्या बाबत प्रशासनाकडून निर्णायक पद्धतीचे लेखी आश्वासन सुरज ठाकरे यांना प्राप्त झाले आहे.

रस्त्यांसंदर्भातल्या उचललेल्या प्रश्नांमध्ये तर राजुरा ते बामणी रस्त्याच्या थेट कामालाच सुरुवात झालेली आहे.

वरुर रोड जवळ असलेल्या क्लब संदर्भातील प्रश्नाबाबत मात्र शासनाने अस्पष्ट उत्तर दिले आहे. उपोषणापूर्वी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता तेथून क्लब संदर्भातील अहवाल हा राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून यायचा आहे, असे सांगण्यात आले होते. आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ दिनांक १९/१०/२०२३ रोजी उपविभागीय दंडाधिकारी राजुरा यांना भेटले असता त्यांच्या लक्षात आले की अजून पर्यंत अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेला नाही. शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्या समोरच उपविभागीय अधिकाऱ्यांनी अहवाल हा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. परंतु अहवालामध्ये क्लब बंद करण्यासंदर्भात उल्लेख आहे की क्लब सुरू ठेवण्या संदर्भात उल्लेख आहे. याबाबत सांगण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. त्यामुळे हा उपोषणातील मुद्दा अनिर्णित राहिला असल्याचे सूरज ठाकरे यांनी सांगितले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रामधील सिमेंट कारखान्यांमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असून देखील कामगारांना महिन्याला 26 दिवस काम देत नसल्याबाबत सुरज ठाकरेंची तक्रार होती. या संदर्भात क्षेत्रीय कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील समस्त सिमेंट कंपन्यांकडून तात्काळ उत्तर मागून पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन केले असल्याचे सुरज ठाकरे यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्नावर महाराष्ट्र शासन हे लवकरात लवकर दिवाळी आधी तोडगा काढून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा करणार असल्याबाबत शासनाने सुरज ठाकरे यांना सांगितले असल्याचे सुरज त्यांनी सांगितले आहे.

तसेच अतिक्रमित पट्ट्या संदर्भात चौकशी करून येत्या पंधरा दिवसांमध्ये अहवाल मागवून समोरची कार्यवाही केली जाईल असे लेखी उत्तर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालया कडून सुरज ठाकरे यांना मिळाले आहे.

तर प्रकाश खडसे यांच्या गाड्या संदर्भातील अनामत रकमेचा प्रश्न सुटला नसल्याने सोमवारी याबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल करत असल्याचे सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे.

एकंदर जवळपास 90% मागण्यांचे समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे सुरज ठाकरे यांनी उपोषणाची सांगता केली. यावेळी आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, बल्लारपूरचे रवी पूप्पलवार, आशिष कुचनकर, राजुराचे अभिजीत बोरकुटे, निखिल बजाईत, अमोल राऊत, राहुल चव्हाण, योगेश गोखरे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर देखील जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन शासनाविरोधात मोर्चे काढण्यार असल्याचे सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राजुरा विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी व स्वतःला भावी म्हणून घेणाऱ्या आमदारांनी या जनहितार्थ सुरू केलेल्या उपोषणाकडे पाठ फिरविल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दांडिया खेळवणारा हवा की रोजगार, रस्ते, आरोग्य व्यवस्था देणारा हवा… हा विचार आता जनतेनेच करावा असे सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here