चंद्रपूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार ?

0
413

चंद्रपूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार ?

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी नुकतेच अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा आता रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी लवकरचं पोटनिवडणुक जाहीर केल्या जाईल काय? अशा चर्चांना उधाण आले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून कॉंग्रेस भुईसपाट झाली असतांना खासदार बाळू धानोरकर यांनी राज्यात एकमेव जागा मिळवून देत पक्षाची लाज राखली होती त्यामुळे ते नेहमी चर्चेत असत. अलीकडेच (३० मे रोजी) अल्पशा आजाराने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंद्रपूर लोकसभेची जागा आता रीक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुनर्वापर करण्याजोगे आवश्यक साहीत्य उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

यामध्ये शपथपत्र नामनिर्देशित पत्र निवडणूक आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र बोटाला लावायची शाई, पिंक पेपर सील आणि ग्रीन पेपर सील यांबाबत तात्काळ आढावा घेऊन अंदाजित मागणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेबरोबरोच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणुक लागणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here