अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
467

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

 

वणी, मनोज नवले (१० ऑगस्ट) : राजूर कॉलरी येथील मजूर कुटुंबातील मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील केळवण या गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

 

राजूर कॉलरी येथे कामानिमित्त आलेल्या या १९ वर्षीय तरुणाने येथीलच अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना १९ जूनला उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. आरोपीचे लोकेशन ट्रेस होताच गोंदिया जिल्ह्यात पोलिस पथक पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजार केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मयूर बलदेव शहारे (१९) रा. केळवण ता. अर्जुनी जि. गोंदिया असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

आईला मोठेबाबाच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. तिच्या वडिलांनी १९ जूनला सायंकाळी ५.४७ वाजता पोलिस स्टेशनला मुलगी घरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशयही वडिलाने तक्रारीतून व्यक्त केला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. दरम्यान राजूर कॉलरी येथे कामानिमित्त आलेला तरुण गावात दिसून येत नसल्याचे समजताच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तब्बल दीड महिन्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस झाले. तो गोंदिया जिल्ह्यातील केळवण या गावचा रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होताच त्याठिकाणी पोलिस पथक पाठवून त्याला अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here