समाजमंदिरातून पाझरू लागले ज्ञानाचे झरे!
कोरोना काळातील शिक्षण

बंदर (शिवापूर) येथील युवकांचा प्रेरणादायी उपक्रम
चिमूर । आशिष गजभिये
कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावाने राज्यभरातील शाळा बंद आहेत. या मुळे गावातील चिमुकले घरात आणि परिसरात खेळताना दिसतात.त्यांना ना कोणी सांगणारे,ना बोलणारे अशावेळी बालकांना संस्काराचे धडे दिले तर कोवळ्या मनावर सकारात्मक संस्कार होतील.ही जाणीव ठेवून चिमूर तालुक्यातील बंदर( शिवापूर) या छोट्याशा गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून गावातील समाज मंदिरातच ज्ञानशाळा सुरू केली.समाज मंदिरातून संस्कारमय ज्ञानाचे झरे पाझरू लागले.
हे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नागपूर, पुणे या शहरात वास्तव्यास होते.पण संचारबंदीच्या काळात या सर्वांना गावी परतावे लागले होते.गावात आल्यानंतर लॉकडाऊन मुळे मुलांची शाळा बंद असल्याने मुले गावात इतरत्र खेळताना दिसायचे आणलाइन वर्गाच्या विद्यार्थ्यांना नेटवर्क ची समस्या असल्याने ते पण शिक्षणापासून वंचित असल्याचं या युवकांना जाणवलं.आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग या दरम्यान मुलांसाठी असे या युवकांच्या मनात आले. त्या साठी त्यांनी गावातील मुलांना शिकवण्याचे ठरवले. मुलांच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केला.या साठी गावातील समाज मंदिराची निवड केली. या युवकांनी स्वतः समाज मंदिर साफ करून स्वखर्चाने पंख व लाईटची व्यवस्था करून ज्ञानशाळा सुरू केली.
असा आहे शाळेचा दिनक्रम
या ज्ञानशाळेची सुरुवात राष्ट्रगीताने करून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध विषयाचे वर्ग त्या विषयात प्रावीन्यप्राप्त युवकाकडून घेतले जातात. हसत-खेळत शिक्षण म्हणून गमतीचे गीत,सामान्य ज्ञान ,रोजचे प्रश्न ,प्रेरणादायी गोष्टी व गृहपाठ दिला जातो. वंदे मातरम ने ज्ञानशाळेची सुट्टी होते. या ज्ञानशाळेने मुलांना शिक्षणाची गोडी लागली. युवकांच्या या उपक्रमाने मुलांना अभ्यासाची सवय व शिस्त लागल्याने पालक समाधानी आहेत. याकरिता शिवापूर (बंदर) येथील निलेश ननावरे, जीवन तराळे, सुमेध श्रीरामे, अनिरुद्ध वासनिक, कार्य करीत आहेत.