रास्तभाव दुकानदाराचा महाघोटाळा

0
1534

रास्तभाव दुकानदाराचा महाघोटाळा

● धान्याचा पुरवठा होण्याआधीच वाटप

● दारोदारी अंगठे घेऊन धान्य चोरीचा धंदा

कोरपना : विरुर (गाडे.) येथील रास्तभाव दुकानदार राजू आत्राम व त्याचा साथीदार अंकुश नागभीडकर शिधापत्रिकाधारकांचे घरोघरी जाऊन अंगठे घेतात. त्यानंतर काही दिवसांनी १०० रुपये घेऊन १० किलो गहू व १० किलो तांदूळ वाटप करतात. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना सुद्धा फक्त २० किलो धान्य व एक किलो साखर दिली जाते. मोफतचे मिळणारे धान्य तर कदाचित वाटप करतात. शिधापत्रिकाधारकांना नियमाप्रमाणे धान्य न देणे, धान्य उचल केल्याची पावती न देणे, मोफत धान्य न देणे, आगाऊ पैसे घेणे असा गोरखधंदा अनेक वर्षापासुन सुरु आहे. काळाबाजारी करुन महाघोटाळा सुरु असल्याने शिधापत्रिकाधारकांनी तहसीलदार कोरपना यांच्याकडे तक्रार केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर विरुर (गाडे.) हे गाव वसले होते. पैनगंगा वेकोली प्रकल्पात ७७ टक्के शेतजमिनी भूसंपादन करण्यात आल्या. वर्षभरापूर्वी गावाचे स्थांनातरण झाले आहे. येथील अनेकांना वेकोली प्रकल्पात स्थायी नोकरी मिळाल्याने घुग्घूस कोलगाव चंद्रपूर येथील रहिवासी झाले आहेत. आता वेकोलीने नविन वसाहत दिली आहे. विरूर येथील रास्तभाव दुकानदार राजु आत्राम याचे नावाने आहे. गडचांदूर येथील महादेव नागभिडकर या दुकानाचा कारभार चालविते अशी माहीती आहे. जानेवारी २०२२ या महिन्याचे धान्याचा पुरवठा होण्याआधीच वाटप झाल्याचे शासनाचे एईपीडीएस या प्रणालीवर दर्शविते. विरुर(गाडे) रास्तभाव दुकानात एकुण १८८ कार्डधारक आहेत. जानेवारी महीन्यात मिळणारे जवळपास ४८ क्विंटल गहू व ३६ क्विंटल तांदूळ परस्पर काळ्याबाजारात विकल्या जाण्याची शक्यता आहे. तहसीलदार कोरपना यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

काळाबाजारीसाठी विरुरचे दुकान सोनुर्ली बसस्टाॅपवर
वर्षभरापासुन येथील रास्तभाव दुकानदार नविन वस्ती विरुर येथे राहतो. त्याचे दुकान मात्र ४ किलोमीटर दुर सोनुर्ली बस स्टॉपवर आहे. गावातील अनेक शिधापत्रिकाधारकांनी दुकान गावामध्ये सुरू करण्याचे सांगितल्याचे उपरांतही केवळ काळाबाजारी साठी दुकान गावाबाहेर ठेवले आहे. पुरवठा विभागाला याबाबतची माहिती नसावी हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

सात महिन्यापासुन धान्य नाही
साधारण गोरगरीब शिधापत्रिका धारकांची लूट करण्याचा सर्रास प्रकार दुकानदारांकडून सुरू आहे. सरपंच पदावर असुन सुद्धा मागील सात महिन्यांपासून रास्तभाव दुकानदाराने मला धान्य दिले नाही. धान्याची मागणी केली असता देतो न धान्य पुढच्या महिन्यात, घेऊन जाल, तुला काय गरज आहे, असे उडवाउडवीची उत्तर देतो. माझ्यामागे माझे घर कुटुंबातील व्यक्तीचे फिंगर घेऊन जातो. विरुर येथील शिधापत्रिकाधारकांना नियमाप्रमाणे पावतीसह धान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तात्काळ करून देण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले असुन येथील रास्तभाव दुकानदाराचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला पाहिजे.सुभाष रघुनाथ दाढे, सरपंच विरुर

मोफतचे धान्य मिळेना…
१०० रुपयांत १० किलो गहु, १० किलो तांदूळ देतो. मोफतचे धान्य देतच नाही. यावरून रास्तभाव दुकानदारासोबत वाद झाला. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे धान्य मिळाले नाही. ११ जानेवारी रोजी माझे नावाने ८० किलो धान्य उचल दाखविते. मात्र मला फक्त २० किलो धान्य १०० रुपयात मिळाले आहे. दामदुप्पट पैसे वसूल करून आमची फसवणुक झाली आहे. शासनाने नियमाप्रमाणे धान्यवाटप करणारा दुकानदार नेमुन दिला तरच आमच्यासारख्या गरिबांना धान्य बरोबर मिळतील. – संतोषी कैलाष काशीपेट्टे, शिधापत्रिकाधारक

“धान्य मिळत नसल्याबाबतचा तक्रारी कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत याबाबत चौकशी करून दोषी असल्यास कारवाई करु” – राजेश माकोडे, पुरवठा निरिक्षक कोरपना*

पुरवठा विभागाकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष
कोरपना पुरवठा विभागाकडे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना नियमाप्रमाणे शासकीय दरात नियमा प्रमाणे धान्य मिळते की नाही, याची पडताळणी करणे तहसीलदार यांचे कार्य आहे. परंतु तहसीलदार पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्याच विश्वासावर विश्वास ठेवून कारभार पाहतात. यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेशनिंगच्या धान्याचा मोठा काळाबाजार सुरू आहे. गोडाऊनमधून धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाटप केला जातो. ऐकल्यास आश्चर्य वाटते. गोरगरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून थेट या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून घोटाळेबाज रास्तभाव दुकानदाराला बेड्या ठोकल्या पाहीजे, अशी मागणी जनतेनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here