माणुसकीच्या जाणिवेतून समाजाभिमुख काम करणारे गणेश मंडळे गरजेची – माजी आमदार वामनराव चटप

0
387

माणुसकीच्या जाणिवेतून समाजाभिमुख काम करणारे गणेश मंडळे गरजेची – माजी आमदार वामनराव चटप

३० गरीब कुटुंबांना हेल्थ कार्ड्स वितरण

गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

नितेश शेंडे, गडचांदुर : कोरोनाने आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असल्याची माणसाला जाणीव करून दिली. आजही आपल्या देशात अनेक रुग्ण योग्य वैद्यकीय उपचारापासून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वंचित असतात. या भीषण संकट काळात खारीचा वाटा उचलत गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामाजिक जाणीवेतून ३० गरीब कुटुंबांना वर्षभर मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ देणारे हेल्थ कार्ड्स वितरित केले हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत माजी आमदार वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

गडचांदुरचा राजा गणेश मंडळातर्फे यावर्षी ‘ परिवर्तन बाप्पा ‘ हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स वितरण, माणिकगड पहाडावरील शेणगाव व पल्लेझरी येथील विद्यार्थ्यांना शालेय किट्स वितरण, नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार, ठाणेदार – मुख्याधिकारी नगर परिषद व गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान ३० गरजू गरीब कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घेत मंडळाने त्यांना हेल्थ कार्ड्स वितरित केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित माजी आमदार वामनराव चटप यांनी उपस्थितांना संबोधित करताना असे प्रतिपादन केले की, “जात – धर्म आदी भेदाभेद सोडून आपण माणूस आहोत. अंतता आपण एकमेकांचे मित्र असतो त्यामुळे वैर भावना मनात आणू नका. माणुसकीच्या जाणिवेतून समाजाभिमुख काम करणारे गणेश मंडळ गरजेची आहेत. या अनुषंगाने गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने उचलले हे विधायक पाऊल कौतुकास्पद वाटते.”
सदर हेल्थ कार्ड्स प्राप्त कुटुंबांना गडचांदुर येथील डॉ. आरती पानघाटे, डॉ. रोहित गोवारदिपे, डॉ. जयदीप चटप यांच्या क्लिनिकला वर्षभर मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ मिळणार आहे.

परिवर्तन बाप्पा या विधायक उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने नवा आदर्श निर्माण केला असून या हेल्थ कार्ड्स वितरण उपक्रमाला माजी आमदार वामनराव चटप, मा.नगराध्यक्ष रमेश नळे, नगरसेवक मधू चिंचोलकर, प्रवीण गुंडावार, नगरसेवक अरविंद मेश्राम, नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी, केशव डोहे, प्रविण एकरे यांच्यासह परिसरातील युवकांची व महिलांची विशेष उपस्थिती होती.

संचालन गणेश कवलकर, प्रास्ताविक सुयोग कोंगरे तर आभार अक्षय मेंढी यांनी मानले. गडचांदूरचा राजा गणेश मंडळाचे राकेश श्रीमंगल, सुनील बुटले, अतुल झाडे, राहुल सहारे, सूरज वांढरे, ब्रम्हा स्वामी यांचे विशेष योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here