नवी दिल्लीत आदिवासी विद्यार्थ्यांना युपीएससीचे मोफत कोचिंग मिळावे
पाथ फाऊंडेशनची आदिवासी विकास मंत्र्यांना मागणी

महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोक हे आदिवासी समुदायाचे आहेत. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या बार्टी संस्थेमार्फत २०० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परिक्षा कोचिंग नवी दिल्ली येथे उपलब्ध केले आहे. तसेच, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा व कुणबी समजातील २२५ विद्यार्थ्यांना ही मोफत सुविधा नवी दिल्ली येथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या महाज्योती अभियानांतर्गत ५०० ओबिसी विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे मोफत स्पर्धा परिक्षा कोचिंग दिले जाते. या अनुषंगाने अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना टी.आर.टी.आय. च्या माध्यमातून युपीएससी परीक्षेच्या तयारीकरिता नवी दिल्ली येथे मोफत कोचिंग देण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पाथ फाऊंडेशनने आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना केली असल्याची माहिती दीपक चटप यांनी दिली.
बहुतांश आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात वास्तवास आहे. शिक्षण व नोकरीत या समुदायाचे प्रतिनिधीत्व अत्यल्प दिसते. या अनुषंगाने ज्या संधी इतर समुदायाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत त्या संधी आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या पाहिजे. या अनुषंगाने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग नवी दिल्ली येथे मिळावे म्हणून शासनाने तातडीने निधी उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मत पाथ फाऊंडेशनचे आदित्य आवारी, बोधी रामटेके, लक्ष्मण कूळमेथे, धम्मदिप वाघमारे, रोहिणी नवले, पूजा टोंगे यांनी केले आहे.