आंतरराष्ट्रीय याेग दिन विशेष लेख ! व्यायामाचे महत्व !

0
973

आंतरराष्ट्रीय याेग दिन विशेष लेख ! व्यायामाचे महत्व !

 

 

 

राजूरा /चंद्रपूर संकलन✍🏻 किरण घाटे 

 

    आपले आरोग्य चांगले निरोगी आणि ठणठणीत ठेवायचे असेल तर आहारा इतकाच व्यायामही महत्वाचा आहे.

पूर्वीच्या काळी कोणत्याच कामासाठी मशिनी नव्हत्या त्यामुळे शारीरिक मेहनत भरपूर होत असे. सर्व स्नायू सांधे यांचा आपोआपच व्यायाम होत असे. जात्यावर दळणे, विहिरीचे पाणी काढणे, झाडणे, कपडे धुणे, खाली बसून स्वयंपाक करणे, वाकून सर्वांना जेवण वाढणे, उखळात कांडणे, धान्य निवडणे, पाखडणे या सारख्या बारीक सारीक कामामुळे बोटापासून हात, पाय, मान, पाठ व पोट इथपर्यत प्रत्येक अवयवाला व्यायाम होत असे. तसेच त्यावेळी शेतीचे कामे पुरुषांना करावे लागत असे. कारण त्यावेळी एवढ्या मोट्या प्रमाणात यंत्र सामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे पुरुषांचाही व्यायाम व्हायचा. व त्यांचे शरीर निरोगी राहायचे. पूर्वीच्या काळी सर्वजण सूर्योदयापूर्वी उठायचे. त्यामुळे ऑक्सिजन म्हणजेच प्राण वायूचा पुरवठा त्यांना भरपूर प्रमाणात व्हायचा.

आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी सुद्धा लोक व्यायाम करायचे. त्यामुळे त्यांची तब्येत एकदम ठणठणीत राहायची.त्याचप्रमाणे आजही भरपूर प्रमाणात लोक व्यायाम करतात. व आजही व्यायाम करणाऱ्यांची प्रकृती ठणठणीत दिसते.आज वाढत्या प्रदूषणामुळे किंवा फास्ट फूड किंवा चमचमीत पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्या स्वास्थावर लवकर फरक पडतो. म्हणूनच आपली तब्बेत खराब होऊ नये. यासाठी रोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

व्यायामामध्ये योगासने हा प्रामुख्याने अंगाचे शिथिलीकरण करणारा, श्वासाचे योग्य नियंत्रण राखणारा व्यायाम आहे. पण योगासने व्यवस्थित शिकून किंवा तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करावी. कारण श्वास कोणत्या वेळी घ्यायचा व कोणत्या वेळी सोडायचा हेच महत्वाचे असते . ते आपल्याला कळले तरच त्याचे फायदे आपल्याला होते अन्यथा नाही.

कोणताही व्यायाम हा रिकाम्या पोटी करावा. त्यासाठी श्यक्य असल्यास सकाळची वेळ चांगली. आपली सकाळची विधी आटोपून व्यायाम करावा. व्यायामाच्या अर्धा तास आधी चहा, कॉफी, दूध घ्यायला हरकत नाही. व्यायाम शक्य असल्यास आंघोळीपूर्वी करावा. व्यायाम करतांना शांत निवांत जागी बसावे. तिथे फार अंधार किंवा फार प्रकाश नसावा. अश्या ठिकाणी स्वच्छ जमिनीवर सतरंजी किंवा आसन टाकून व्यायाम करावा. व्यायाम करतांना थोडे थकल्यासारखे वाटले तर थोडे थांबावे व पुन्हा व्यायाम करावा. पूर्ण व्यायाम संपल्यावर शवासन करावे म्हणजे यात सर्व शरीर शिथिल होते. व्यायाम झाल्यानंतरही थोडावेळ शांत बसावे. लगेच काही काम करणे किंवा लगेच काही खाणे टाळावे. तरच त्याचे योग्य फायदे मिळतात.

सकाळच्या वेळी व्यायाम करणे श्यक्य नसेल तर सायंकाळी सुद्धा करू शकता. पण आपले दुपारचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी चार तासानंतर व्यायाम करावा.

व्यायामामुळे आपले शरीर व मन दोन्हीही ताजेतवाने राहतात. उत्साह वाढतो. ताणतणाव दूर होतो. आपल्याला आळस येत नाही. आपल्यातील नकारात्मकता दूर होऊन आपल्याला सकारात्मक विचाराची सवय लागते. आपले तन – मन उत्साही राहते. म्हणून आपण नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

चला तर मग आज पासून आपण सर्व नियमित व्यायाम करूया आणि आपले शरीर व मन निरोगी व तंदुरुस्त ठेवूया…

 

 

   !! करे योग रहे निरोग !!

  सौं. सरोज वि. हिवरे

काव्यकुंज संयोजिका

सहकार नगर रामपूर राजुरा

जिल्हा,  चंद्रपूर‌..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here