वैनगंगा नदीला पूर: जुनगाव गंगापूर चा संपर्क तुटला
चंद्रपूर:भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे एकोणवीस दरवाजे एक मिटर उचलल्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून नदीकाठील गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीला पूर आला असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या जुनगाव आणि गंगापूर या गावांचा संपर्क इतर जगाशी तुटला आहे.
या नदीला पूर आला असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या जुनगाव आणि गंगापूर टोक या गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.
गावाच्या चारही दिशांनी वैनगंगा नदीने वेढा दिला असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते. ही समस्या लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेऊन वैनगंगा नदीच्या उपप्रवाहावर पूल बांधण्यात आला. परंतु या फुलाची उंची फारच कमी असल्यामुळे दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असते. कायमस्वरूपी या गावांना जगाच्या संपर्कात आणण्यासाठी पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र ही मागणी अद्याप धूळ खात असल्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावात जनावरांवर मोठ्या प्रमाणात अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पाळीव जनावरे रोगाने ग्रस्त झाले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी या पुरामुळे अडचण निर्माण झाली असल्याने गावकरी व पशुपालक चिंतेत आहेत.
