खुल्या भूखंडधारकांवर होणार कारवाई महापालिकेचा निर्णय

0
503

खुल्या भूखंडधारकांवर होणार कारवाई महापालिकेचा निर्णय

राजु झाडे

चंद्रपूर २१ ऑक्टोबर – शहरात प्रापर्टीच्या नावावर अनेकांनी भूखंड खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, हे भूखंड आजघडीला परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संबंधित मालकांनी भूखंडाची स्वच्छता करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
चंद्रपूर शहराभोवती छोट्या-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरले आहे. यातूनच चंद्रपूूरला औद्योगिक जिल्ह्याची ओळख मिळाली. या उद्योगांत रोजगारासाठी गावखेड्यातील अनेकजण शहरात दाखल झाले आहेत. किरायाच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यातूनच
चंद्रपूर शहराचे महानगरात रुपांतर झाले. किरायाच्या घरातून अनेकांनी स्वत:च्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्ने बघितली. पैशाची जुळवाजुळव करून मिळेल तिथे भूखंड खरेदी करून ठेवले आहेत. तर, शहरातील अनेकांनी प्रापर्टीच्या नावावर भूखंड खरेदी करून ठेवले आहेत.
मजूरवर्गाकडे घरे बांधण्यासाठी लाखो रुपये हातात नाही. बँकेकडूून कर्ज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या घराचे स्वप्न लांबत आहे. तर, दुसरीकडे काही केवळ जमिनीचा दर वाढून जास्त पैसा मिळेल, या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या खुल्या भूखंडांत अनेकजण कचरा टाकत आहेत. बघता बघता कचऱ्याचे ढिगारे तयार होऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत वॉर्डातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेत महापौर राखी कंचर्लावार यांनी नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मनपा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत कचऱ्याचे साम्राज्य असलेल्या भूखंडाची संबधित मालकांनी तपासणी करावी. अन्यथा मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले.
शहरातील खुल्या भूखंडधारकांची यादी तयार करावी. भूखंडावर कर आकारणी करावी. ३१ ऑक्टोबरपर्यंत भूखंडधारकांना नोटीस बजावावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अनिल घुमडे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, उपस्थित होते.
शहरात जिथेही विद्युत खांब रस्त्यावर आलेले आहेत असे खांब काढण्यासाठी त्यांची यादी तयार करून ती म.रा.विद्युत वितरण कंपनीकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. शहरातील मोक्याची ठिकाणे निश्चित करणे, दर निश्चित करणे, शुभेच्छा फलकांची जागा निश्चिती करणे, अन्य होर्डिंग्जची यादी तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरातील मोकाट कुत्री, डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here