आदर्श घाटकुळची काजल करणार देशाचे प्रतिनिधित्व

0
2066

आदर्श घाटकुळची काजल करणार देशाचे प्रतिनिधित्व

आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी निवड : बालपंचातीच्या सर्वोत्कृष्ठ कामाची विदेशात दखल

पोंभुर्णा तालुका पोहचला जगाच्या नकाशावर

पोंभुर्णा :

पोंभुर्णा तालुक्यातील आदर्श ग्राम घाटकुळ येथे बालकांचे हक्क, अधिकार, समस्या निवारण व सर्वांगिण विकासासाठी युनिसेफ व जिल्हा परिषदेच्या माध्यमाने ग्रामपंचायतीच्या धर्तीवर ‘बालपंचायत’ हा बालकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. सदर बालपंचातीचे काम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वोत्कृष्ठ ठरले. बालपंचायतीची सरपंच कु.काजल चांगदेव राळेगावकर ही बालिका देशातील बालपंचायतीचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात करणार असून त्यासाठी तीची युनिसेफकडून निवड झाली आहे.

युनिसेफच्या माध्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवाद आशियायी राष्ट्रांसाठी ‘बाल सहभागिता व नागरी संवाद’ याविषयी मार्गदर्शिका बनवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या परिसंवादात अमेरिका, भूतान, श्रीलंका, नेपाळ यासारख्या अनेक देशांचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत. यात आदर्श गाव घाटकुळ येथील कु.काजल चांगदेव राळेगावकर ही एकमेव बालिका भारत व अन्य राष्ट्रांच्या बालकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. आशिया खंडातील सर्व बालकांच्या वतीने काजल आपले विचार व्यक्त करणार आहे. ५ नोव्हेंबरला सदर जागतिक दर्जाचे बालकांचे धोरण ठरवण्याबाबत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिसंवाद पार पडणार आहे, अशी माहीती युनिसेफचे राज्य सल्लागार प्रमोद कालेकर यांनी दिली.

घाटकुळ येथील बालपंचायतीने ग्रामविकासात सक्रिय पुढाकार घेवून नाविण्यपुर्ण उपक्रम राबवले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात काजलने बालपंचायतीची भुमीका मांडली होती. त्यावेळी काजलचे त्यांनी कौतुक केले. नुकतेच देशपातळीवर युनिसेफच्या तज्ञासोबत सरपंच काजलने चर्चासत्रात सहभागी होवून बालकांच्या धोरणांविषयी मत मांडले. काजलला युनिसेफच्या समन्वयक वर्षा रामटेके, प्रेरक मुकुंदा हासे, संदीप शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन मिळते. आंतरराष्ट्रीय परिसंवादात देशाचे प्रतिनिधित्व करणा-या घाटकुळ बालपंचायतीच्या सरपंच कु.काजलचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

••••••

 

राळेगावकर परिवार ठरतोय गावाला आदर्श !

कु.काजल राळेगावकर ही बालिका शिक्षणासोबत गावातील नाविण्यपूर्ण उपक्रमात सहभागी असते. काजलचे वडील चांगदेव राळेकर हे निस्वार्थपणे गावाच्या विकासासाठी सातत्यपुर्ण योगदान देत आहे. त्यांनी आपली अर्धा एकर जमीन ग्रामपंचायत व वाचनालय बांधकामासाठी दिली. काजलचा भाऊ व्यंकटेश उत्कृष्ठ क्रिडापटू असून तो गावात स्वच्छता अभियान व श्रमदानात सक्रिय असतो. एकंदरित राळेगावकर परिवार घाटकुळ गावासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे.

••••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here