बल्लारपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यस्थिती महोत्सव

139

बल्लारपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यस्थिती महोत्सव

भजन संमेलनात 45 भजन मंडळाच्या सहभाग

बल्लारपूर/रोहन कळसकर
तालुक्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्थानिक सार्वजनिक हनुमान मंदिर, विवेकानंद वार्ड, बल्लारपूर येथील प्रांगणात शनिवार व रविवारला वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव पार पडला. यामध्ये ध्यान प्रार्थना, भजन संमेलन, कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, कार्यकर्ता संमेलन व महाप्रसाद वितरण कार्यक्रम घेण्यात आले. भजन संमेलनात तब्बल ४५ भजन मंडळानी सहभाग घेऊन अनोखी आदरांजली अर्पण केली. दरम्यान पालखी मिरवणूकीच्या माध्यमातून राष्ट्रसंताच्या विचारांचा संदेश देण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांना भजन संमेलनाच्या माध्यमातून गीतरूपाने आदरांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये विसापूर, राजुरा, बामणी ( दुधोली ), चंद्रपूर, इरई बोरगाव व अन्य ४५ च्या जवळपास भजन मंडळानी राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित भजन करून अनोखी आदरांजली वाहिली.

रविवारी सकाळी पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भक्तीमय वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत बँड पथक, गावागावातील भजन मंडळ व गुरुदेव भक्तांच्या सहभागातील मिरवणूक एकतेचा संदेश देत मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत होती. गुरुदेव भक्तांनी ठिकठिकाणी पालखीचे औक्षण केले.

दरम्यान प्रा. अशोक चरडे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून गुरुदेव भक्तांचे प्रबोधन केले. कार्यकर्ता संमेलनात गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी दत्ता हजारे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगरसेवक अरुण वाघमारे, माजी नगरसेवक पवन मेश्राम, एम. व्यंकटेश बालबैरय्या, विकास दुपारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजक व बल्लारपूर तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी भास्कर डांगे, मारोती सोयाम, रामभाऊ पेटकर, भैयाजी त्रंबके, गंगाराम धोटे, मधुकर त्रंबके, श्रीराम वऱ्हाडे, दिपक मेश्राम, पंढरी क्षीरसागर, गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला तालुका प्रमुख अरुणा डांगे आदींनी सहभाग घेऊन पुण्यतिथी महोत्सव यशस्वी केला.

advt