पंढरीच्या विठुरायाच्या भेटीनंतर शिवछत्रपती आपल्या जन्मभूमीत परतले

0
441

पंढरीच्या विठुरायाच्या भेटीनंतर शिवछत्रपती आपल्या जन्मभूमीत परतले

पायी चालण्याची परंपरा आषाढी वारीतही अखंडितपणे जपलेला शिवरायांचा पालखी सोहळा ठरला एकमेवाद्वितीय’

 

जुन्नर, प्रतिनिधी : भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होऊन हिंदवी स्वराज्य राजधानी रायगडास परतीची वारी पोहचविलेल्या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पादुका पुढील अकरा महिन्यांच्या वास्तव्यासाठी शिवजन्मभूमी शिवनेरीस पोहोचल्या. चंद्रभागास्नान, नगर प्रदक्षिणेसह *आषाढी एकादशीलाच श्रीशिवछत्रपतींच्या पादुका पंढरीच्या राण्याच्या दर्शनास* गेल्या होत्या. गुरुपौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहूनच शिवछत्रपती पंढरीत आलेल्या सर्वच पालख्यांच्या दर्शनास गेल्याने संतभेटीचा नवा पायंडा पडला. तसेच सर्वच संतांच्या पालख्यांनी भूवैकुंठ पंढरपूर निर्विघ्नपणे सोडल्यानंतरच पिछाडी निर्धोक करुन मगच पंढरी सोडण्याची नवी परंपरा श्रीशिवछत्रपतींच्या पालखीने यंदापासून रुढ केली.

आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राजाभिषेकापासून पुढील ५ दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. कोरोना पार्श्वभूमीवर अनेकानेक निर्बंध असतानाही *आपल्या आराध्याच्या समाधीस्थानापासून पंढरीच्या विठुरायाच्या चरणांपर्यंत ४२६ किमी अंतर केवळ ९च दिवसात पायीच जाण्याची परंपरा अखंडितपणे जपलेला श्रीशिवाजी महाराजांचा पालखी सोहळा यंदा एकमेवाद्वितीय ठरला. प्रथा-परंपरेप्रमाणे आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पावनखिंडीच्या मोहिमेनंतर रायगडाला परतीची वारी पोहचविली की पुढील वर्षभरासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. यावर्षी बेसुमार पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे, महापुराच्या संकटाने निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे श्रीशिवाजी महाराजांच्या पादुकांना रायगड व पावनखिंडीत पोहोचण्यास तब्बल १८ दिवसांचा विलंब झाला होता. शिवछत्रपतींच्या पायी पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ७ वे वर्ष होते.

कोरोना महामारीमुळे शासकीय प्रतिबंधात्मक नियम कठोर असल्याने, शिवाई देवीच्या चरणांशी शिवछत्रपतींच्या पादुका परत घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी प्रदीप बवले, अजित शिंदे, गौरव भंडारे, विराज मेमाणे, ह.भ.प. साहिलबुवा शेख व पलाश देवकर यांना मिळाली होती.

कोरोना काळातही सर्व नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, शिवराज संगनाळे, केदार पुरवंत, हर्षवर्धन कुर्हे, सचिन पांडे, सूरज खत्री, शिवा खत्री यांनी परिश्रम घेतले. पंढरपुराहून परतलेल्या शिवछत्रपतींच्या आपल्या जन्मभूमीतील पुनरागमन स्वागतास जुन्नर व कुसूरवासीय श्रद्धाळू ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. तर आवश्यक त्या परवानग्या देऊन पुरातत्व विभागाचे अधीक्षक जंगले, मंगेश बोचरे, दाभाडे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपान दुराफे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, लोहकरे, गणेश जोरी, उपवनसंरक्षक श्री. गौडा, राठोड या सर्व शासकीय संस्था व स्थानिक मंदिर संस्थानने बहुमूल्य सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here