कोरपना तालुक्याला मिळणार ‘तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय’
आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश : चिकित्सालयाच्या स्थापनेस शासनाची मंजुरी
कोरपना, दि. २१
तालुक्यातील श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशु सर्व चिकित्सालय (तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय) मध्ये रूपांतर करण्यास आमदार देवराव भोंगळे यांनी पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडे सातत्यपूर्ण मागणी करीत पाठपुरावा केला असता पशुसंवर्धन आयुक्तालयाने सदर प्रस्तावास मान्यता दिली असून लवकरच कोरपणा तालुक्याला तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय मिळणार आहे.
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले की, कोरपना परिसरातील शेतकरी व पशुपालकांच्या दिर्घकालीन मागणीचा विचार करून ही मागणी शासन दरबारी लावून धरली. शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कोरपणा तालुक्यातील पशुसंवर्धन सेवेला नवे बळ मिळणार आहे. हा निर्णय कोरपना तालुक्याच्या शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी मोलाचा असून पशुधन आरोग्यसेवा आता अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कोरपना तालुक्यात शेतकरी पशुपालकांना सोईचे ठरतील असे पशुवैद्यकीय चिकित्सालय व्हावे ही शेतकऱ्यांची इच्छा होती. याची दखल आमदार देवराव भोंगळे यांनी (दि. २५ फेब्रुवारी) पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय करण्याचा प्रस्ताव सदर केला. त्यानुसार पशुसंवर्धन आयुक्तालयाने सदर प्रस्तावास मान्यता दिली आहे.
शासनाने राज्यातील १४८ तालुक्यांमध्ये तालुका स्तरावर ‘तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय’ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली यामध्ये कोरपना तालुक्याचा समावेश असून तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच त्याठिकाणी पशुधन विकास अधिकाऱ्याचे रिक्त पद भरण्याबाबत शासन स्तरावरून कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कोरपना तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांनी समाधान व्यक्त करीत आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.