आवाळपुर ते नांदाफाटा रस्त्याच्या कडेला थांबणारी अवैध ट्रक पार्किंग ठरतेय जीवघेणी!!!
प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची संभावना

कोरपना/आवाळपुर (नितेश शेंडे) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदाफाटा ते आवाळपुर या मार्गाला रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, दुचाकीस्वारांना, विद्यार्थ्यांना, अल्ट्राटेक सिमेंट प्लांट मध्ये जाणाऱ्या कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
अल्ट्राटेक कंपनीमुळे येथे येणाऱ्या मोठ्या मालवाहतूक वाहनामुळे या ठिकाणी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे गडचांदूर ते आवाळपुर मार्गावरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मोठमोठ्या वाहनांमुळे नियमित मुख्य रस्त्यावर जीवघेणा अडथळा निर्माण झाला आहे. ये-जा करतांना नागरिकांना त्रास होत आहे. मात्र स्थानिक वाहतूक पोलीस तथा प्रशासनाचे मुद्दाम दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. संबंधित विभागाकडून मुद्दाम डोळेझाक होत असल्याने रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या या मालवाहतूक वाहनांमुळे एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन मुद्दाम तर अपघाताची वाट पाहत नाही ना ? अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे. यापूर्वी सुद्धा या मार्गावर अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रशासनाकडून सातत्याने या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याकडेला अवैध उभ्या असणाऱ्या वाहनधारकांना कुणाचे अभय आहे ? अशी सर्वत्र चर्चा असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पोलीसप्रशासन व स्थनिक प्रशासन यांनी सदर समस्यांकडे जातीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. ही समस्या लवकर मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरीकांनी दिला आहे.