पोलीस प्रशासनाच्या कारवाईला ‘खो’ देत जनावर तस्करी सुरुच, तस्करांची दबंगगिरी

0
550

पोलीस प्रशासनाच्या कारवाईला ‘खो’ देत जनावर तस्करी सुरुच, तस्करांची दबंगगिरी

impact24news
राजुरा (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडे अवैध धंद्यांचे अवडंबर चांगलेच माजले आहे. दारू तस्करी, कोळसा तस्करी, भेसळयुक्त सुगंधित तंबाखू विक्री, रेती चोरी, खून याबरोबरच गोमांस व गोतस्करीही प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता राजरोसपणे सुरूच आहे. मात्र यावर आळा घालून कठोर कारवाई करण्यास प्रशासन अपुरे पडत असल्याने या तस्करांचे मनसुबे बुलंद झाले असून दबंगगिरी वाढताना दिसून येत आहे. जनावर तस्करीचे मोठे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय आहे.
नवनवीन शक्कल लढवत पोलीस प्रशासनाला हुलकावणी देत कत्तलीकरिता मुक्या निष्पाप जनावरांची तस्करी लपंडावरीतीने सुरु असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कधी आयशर तर कधी पिकअप या चारचाकी वाहनाने रात्र-दिवस जनावरांची वाहतूक तेलंगणात केल्या जात आहे. रोज रात्री ९ ते १० वाजे पासून पहाटे पर्यंत हा तस्करीचा गोरखधंदा बिनबोभाटपणे केल्या जात आहे. कोठारी-तोहोगाव ते वर्धा नदीच्या पुलावरून चिंचोली-अंतरगाव मार्गे तेलंगणात शेकडोच्या संख्येने जनावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई होताना दिसून येत नाही. या मार्गावर पडणाऱ्या पोलीस ठाण्याचे ठाणेदार मोठी चंबळ असलेल्या या जनावर तस्करीबाबत अनभिज्ञ कसे राहू शकतात…? हा जनतेला पडलेला गहन प्रश्न अनाकलनीय आहे.
नुकतीच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी धडक कारवाई करत ८६ जनावरांना जीवनदान देत वाहने जप्त केली होती. मात्र संधिसाधू तस्करांकडून लपंडावरीतीने कत्तलीसाठी तेलंगणात जनावरांची तस्करी प्रशासनाच्या कारवाईला ‘खो’ देत सुरूच आहे. या मोठे नेटवर्क असलेल्या जनावर तस्करीला आळा बसून कठोर कारवाईची आशा असलेल्या जनतेच्या अपेक्षा निष्फळ ठरत आहेत. जिल्हास्तरीय पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत निष्पाप मुक्या जनावरांना जीवनदान देऊन या तस्करांना वेळीच लगाम लागून यांना जरब बसेल का, याकडे जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here