जिवती तालुक्यातील नायवाडा येथे पाण्याची समस्या कायमचीच!!!
भर पावसाळ्यात गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण

प्रशासनाकडून डोळेझाक, ग्रामस्थांमध्ये चांगलाच संताप
जिवती (तालुका प्रतिनिधी) : सात दिवसापासून जिवती तालुक्यातील नायवाडा येथे पाणी पुरवठा बंद असल्याने येथील नागरीकांना खुप मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक यासह आमदारांच्या समक्ष समस्या असूनही याकडे गांभीर्यपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून बराच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्यासाठी नागरिकांना बरीच पायपीट करावी लागत आहे. नायवाडा येथून २ कि.मी अंतरावरील माथाडी या गावी एकच बोअरवेल आहे. मात्र तेथील ग्रामस्थ पाणी भरू देण्यास मनाई करतात. नायवाडा वरून तब्बल ५ कि.मी अंतरावरील पल्लेझरी या गावी जाऊन मोठ्या शिताफीने पाणी आणावे लागत आहे. दिवसभरात एक व्यक्ती एकच गुंड (घागरी) घेऊन येतो. ज्याच्याजवळ दुचाकी आहे ते घेऊन येतात. ज्याच्याजवळ येजा करण्याचे साधन नाही त्यांनी काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन गावातील समस्या सांगितली. गावात एक विहीर मंजूर करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आहे. नायवाडा वरून ४ किमी वर बेलगाव या गावावरून पाईप लाईन असल्याने माथाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी एक आॅफरेटर ठेवला आहे. तेथुन नायवाडा या गावी पाणी येत असते. जर पानी सोडले नाही तर दुस-या गावातुन पाणी आणावे लागते. हि समस्या ग्रामसेवक ला सांगितली असता ते म्हणतात सरपंचाला सांगा, तर सरपंच म्हणतात बिडीओला सांगा. अशी टाळाटाळीची उत्तरे स्थानिक ग्रामस्थांना ऐकावी लागत आहेत.
पाणी हे जीवन असून याकरिता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. या ग्रामीण भागातील जनतेचे वाली कोण? पाण्यासाठी होणारी वणवण कधी सुटेल हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.