एक महिन्यापासून नाली बांधकामाच्या प्रतीक्षेत! भारोसा ग्रामपंचायतचा प्रताप…
कोरपणा/प्रतिनिधी : कोरपणा तालुक्यातील भारोसा ग्रामपंचायत येथील भारोसा गावात नालीचे खोद काम करून १ महिना उलटून गेला परंतु अजूनपर्यंत या नालीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. सदर नाली भिकाजी बोबडे यांच्या घरापासून ते नीलकंठ रोगे यांच्या घरापर्यंत १०० ते १५० फूट अंदाजे किंमत ५ लाख रुपये असून फक्त खोदकाम करून ठेवले आहे. एक महिना उलटून गेला तरी बांधकामाचा मुहूर्त ग्रामपंचायतला मिळेना? यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सदरच्या नालीचे खोदकाम माणिकगड सिमेंट कंपनीच्या फंडातून सुरु करण्यात आले होते. परंतु काही जणांनी राजकारण मधात आणून हे काम आमदार निधी अंतर्गत आले म्हणून रोखले. स्थनिक नागरिकांनी सरपंच व ठेकेदार यांना विचारणा केली असता आज करू, उद्या करू असे सांगत असून एक महिना उलटला आहे. मात्र अजून या कामाचा मुहूर्त निघाला नसल्याचे दिसून येत आहे. खोदकाम करून रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांना कमालीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामाबाबत स्थानिक जनतेने ठेकेदाराकडे वारंवार विचारणा केली असता तुम्ही यामध्ये कशाला पडता अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.