‘प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या’ वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य कुशल मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगार यांची निवेदनातून मागणी
बरांज मोकासा गावाचे पुनर्वसन किती दिवसात करणार याची लेखी माहिती द्या!

एम्पटा कोल लिमिटेड (बरांज प्रोजेक्ट) चे सहाय्यक महाप्रबंधक यांना निवेदन सादर…
भद्रावती, (६ एप्रिल) प्रतिनिधी । एम्पटा कोल लिमिटेड माईन्स मध्ये बरांज मोकासा हे गाव प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर झाले आहे. या गावातील शेतकऱयांची शेती सदर प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर व शेतीवर अस्थायी काम करणारे मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यापैकी अगदी मोजकेच मजूर प्रकल्पग्रस्त म्हणून कंपनीत कामाला आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या जीआर प्रमाणे प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना ८० टक्के रोजगारात समाविष्ट करण्याचा शासन निर्णय असूनसुद्धा कंपनीकडून शासनाच्या नियमाची पूर्णतः पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना शासनाच्या जीआर प्रमाणे कंपनीत सामावून घ्यावे व बरांज मोकासा या गावाचे पुनर्वसन किती दिवसात करण्यात येईल याचे लेखी आश्वासन कंपनीतर्फे देण्यात यावे या मागणीचे निवेदन एम्पटा कोल लिमिटेड (बरांज प्रोजेक्ट) चे सहाय्यक महाप्रबंधक यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य कुशल मेश्राम यांच्या नेतृत्वात काल देण्यात आले.
सदर कंपनीतील उत्खननाचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आले असून यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून पर राज्यातील मजुरांचा भरणा करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सर्रासरित्या स्थानिकांवर अन्याय करत शासकीय निर्देश नियमांची पायमल्ली करण्याचे षडयंत्र कंपनीतर्फे योजिले जात आहे. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रोजच तक्रारी येत आहेत.
कंपनीच्या या कृत्यामुळे प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत सदैव असल्याचे निवेदनातून स्पष्ट सांगण्यात आले आहे. सदर बाबीकडे कंपनीने गंभीरतेने लक्ष देऊन योग्य निर्णय न घेतल्यास कंपनी विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल व होणाऱ्या नुकसानास कंपनी प्रशासन जबाबदार राहील असा सूचक इशाराही वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी वबआचे जिल्हा सल्लागार कापूरदास दुपारे, तालुकाध्यक्ष विजय इंगोले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संध्याताई पेटकर, नगरसेवक तथा शहराध्यक्ष राहुल चौधरी, नगरसेविका तथा शहराध्यक्ष महिला आघाडी राखिताई रामटेके, नगरसेवक तथा जिल्हा सदस्य सुनील खोब्रागडे, नगरसेवक सुनील देवगडे, नगरसेविका सीमाताई ढेंगळे, बरांज ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल पुनवटकर, मनीषा बाळपने, ज्योती पाटील सह आदी प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगार मोठया संख्येने उपस्थित होते.