साखरी खदान मध्ये युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
राजुरा( चंद्रपूर): साखरी खदान मध्ये पाण्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार सदर युवकाचे नाव विशाल हंसकर असून वरोडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. बल्लारपूर क्षेत्रातील साखरी (पौनी २/३ ओ सी) खदानमध्ये असलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. खदानी मध्ये पंपाने पाणी काढत असताना चिखलात फसल्याने सदर मृतक युवकाला वरती येण्याची संधी न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सदर युवकाचे वय २० वर्ष असून तो मुन्ना नामक ठेकेदाराकडे कामाला होता. सध्या घटनास्थळी मोठा जमाव असून शव असलेल्या रुग्णवाहिकेला नागरिकांनी घेरले आहे. सदर युवकांच्या कुटूंबातील एका सदस्याला नोकरी व आर्थिक लाभ देण्याची मागणी मान्य केल्याशिवाय शव उत्तरीय तपासणी करण्यासाठी नेऊ न देण्याची भूमिका संतप्त जमावाने धरली आहे.
