सास्ती-गोवरी परिसरात वर्धा नदीपात्रातून रेतीच्या चोरट्या वाहतूकिला ऊत
राजुरा(चंद्रपूर):- तालुक्याच्या ठिकाणाजवळील सास्ती, गोवरी, रामपूर, धिडसी, धोपटाळा, शिवलण घाट,कुर्ली, धिडशी नदीघाट या गावात वर्धा नदी पात्रातून रेतीच्या चोरट्या वाहतुकीला ऊत आला आहे. राजकीय दबावापोटी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांत सुरु आहे.
तालुक्यात रेतीच्या चोरट्या वाहतुकीला सध्या बराच ऊत आल्याची चर्चा तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळते. सदर परिसरातील नाले व वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे. हि संधी हेरून स्थानिक ट्रॅक्टर मालकांकडून रेतीची चोरटी वाहतूक करण्याचा घाट मध्यरात्री व पहाटेला घातला आहे. अव्वाच्या सव्वा किमतीला रेतीची विक्री केल्या जात असून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावला जात आहे.
शासनाच्या ढिसाळ धोरणाने व तलाठ्यांच्या संगनमताने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. राजकीय वरदहस्त असल्याने ट्रॅक्टर मालक गब्बर बनले असल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.
महसूल विभाग व वन प्रशासनाकडून थातूरमातूर ढिसाळपणा न करता तातडीने पाऊले उचलून या रेती चोरट्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
