मार्गाची केली पाहणी, नागरिकांच्या सोईसाठी वन वे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश
चंद्रपूर (आनंद राव) : पडोली ते तिरवंजा या दुतर्फा मार्गाच्या निर्मितीचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. परिणामी दोन वर्ष लोटूनही सदर मार्ग पूर्ण झालेला नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना प्रवासा दरम्यान चांगलीस अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देत या रोडचे काम जलद गतीने करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेत तसेच काम पूर्ण झालेला वन वे दोन दिवसात सुरु करण्याचे निर्देशही यावेळी दिले आहेत.
९ कोटी रुपये खर्च करून पडोली ते तिरवंजा या दुतर्फा रोडच्या निर्मितीचे काम केल्या जात आहे. हा पडोली ते तिरवंजाला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने येथील रहदारी अधिक आहे. त्यातही वेकोली कामगारांची मोठी रहदारी या मर्गावर आहे. मात्र या मार्गाच्या निर्माण कार्यात दिरंगाई होत असल्याने नागीकांच्या अडचणीत भर पडली आहे. तसेच या मार्गावरील अपघातांच्याही संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे निर्माण कार्य लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आहे. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी काल गुरुवारी सदर मार्गाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त प्रभारी उपविभागीय अभियंता गिरनाडे, प्रभाकर धांडे यांच्यासह गावकर्यांची उपस्थिती होती. नागरिकांच्या सोयीसाठी विकासकामे केली जातात. मात्र ठराविक वेळेत ती कामे पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या अडचणीत भर पडू शकते त्यामुळे ठराविक वेळेतच सर्व कामे होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्यात. तसेच या मार्गच्या निर्माण कार्यात होत असलेल्या दिरंगाई बाबतही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलीस नाराजी व्यक्त केली. या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे तसेच एक तर्फा मार्गाचे काम दोन ते तीन दिवसात पूर्ण करून हा एक तर्फा मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी सुरु करण्यात यावा असे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेत.
