खोब्रामेंढा जंगलात पोलिस – नक्षल चकमकीत पाच माओवादी ठार

0
455

खोब्रामेंढा जंगलात पोलिस – नक्षल चकमकीत पाच माओवादी ठार

गडचिरोली, ता. २९ : पोलीस उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवार, २९ माचॕ रोजी सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ३ पुरूष व २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. शनिवार २८ मार्चपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहे. आतापर्यत दोन चकमकी झाल्या आहे. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. तेव्हा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना शनिवार २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनीटे चाललेल्या चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here