चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी वीजरोधक पोल यंत्र उभारणार : ना. विजय वडेट्टीवार यांचे विशेष प्रयत्नातून 33 कोटी रुपये मंजूर
वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपयोग
ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे विजरोधक पोल यंत्र उभारून शुभारंभ
चंद्रपूर जिल्ह्यातील 827 ग्रामपंचायतीसाठी 20 कोटी 92 लक्ष मंजूर
गडचिरोली जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी 11 कोटी 56 लक्ष मंजूर
चंद्रपूर, दि. 23 मार्च : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात विज पडून निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व संबंधित कंपन्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या, व मदत व पुनर्वसन विभागाकडून चंद्रपूर जिल्हयातील 827 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यासाठी 20 कोटी 92 लक्ष रूपये तसेच गडचिरोली जिल्हयातील 475 ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधक पोल यंत्रासाठी 11 कोटी 56 लक्ष रुपये मंजूर केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील 1 हजार 302 ग्रामपंचायतीसाठी 32 कोटी 48 लक्ष रुपयांचा निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हे काम युध्द पातळी सुरू करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे 22 मार्चला वीज रोधकपोल यंत्र उभारून करण्यात आलेला आहे. यावेळेस ब्रम्हपुरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सौ मंगलाताई इरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्या भावनाताई ईरपाते, ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मंगलाताई लोनबले, ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्या नयना गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा गभणे, ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या चौधरी, मंत्रालयाचे अधिकारी,, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,विजरोध पोल उभारणी कंपनी अधिकारी, आदीसह संतोष आंबोरकर,चंदु जेल्लेवार, निरंजन ढवळे व ग्रामपंचायत कर्मचारी, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.