व्यक्ती विशेष ! संभाजी पवार! कुस्ती आणि राजकीय आखड्यातील मल्ल! जयंत माईणकर
पैलवानांची अक्कल गुडघ्यात असते असे म्हणतात.
(तमाम पैलवानांनो मला माफ करा) पण संभाजी पवार त्याला अपवाद असावेत.१९८६ साली पहिल्यांदा वसंतदादा पाटील यांच्या राजीनाम्यामुळे झालेल्या सांगली पोटनिवडणुकीत हा कुस्तीच्या आखाड्यात बिजली प्रमाणे हालचाल करत प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला गारद करणारा कुस्तीगीर जायंट किलर ठरत निवडून आला.दादांचे पुतणे स्व विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव करून जनता दलाच्या तिकिटावर ते निवडून आले होते. त्यांची विधानसभागृहात ओळख करून देताना तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला उद्देशून, “आहे का तुमच्याकडे यांच्या तोडीचा मल्ल” ,अस म्हटल होत. तर १९९० साली पवार सरकारविरोधात अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना दादा कळमकर या काँग्रेस आमदारानी माझ्याशी कुस्ती खेळून दाखव अस भर सभागृहात आव्हान दिल होत. पण संभाजी पवारांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरल्यानंतर आपल्यातल्या पैलवनाला दूर ठेवले. स्व वसंतदादांचे पुत्र स्व प्रकाशबापू आणि पुतणे विष्णूअण्णा यांच्यातील भांडणाचा फायदा घेत ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या विरुद्ध विष्णुअण्णा उभे राहिले की प्रकाशबापू त्यांना मदत करायचे आणि प्रकाशबापू उभे राहिले की विष्णु अण्णा. पण या दोघांच्याही मृत्यूनंतर संभाजीराव लागोपाठ दोन निवडणुका हरले आणि आपण कधिही भाजप, शिवसेने , काँग्रेसमध्ये जाणार नाही असं विधिमंडळ कँटीनमध्ये बसून गप्पा मारताना मला सांगणारे पैलवान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत २००९ ला भाजपमध्ये सामील झाले आणि चौथ्यांदा ते आमदारही झाले. पण त्या पक्षात ते रमले नाहीत.आणि २०१४पासून एकेकाळी कुस्तीचा आणि राजकारणाचा आखाडा गाजवणारे हे मल्ल निवृत्तीच जीवन जगत होते. त्यांचे अतिशय जवळचे मित्र व्यंकप्पा पत्की. त्यांना त्यांनी विधानपरिषदेत निवडूनही आणले होते. संभाजीरावांच सांगलीच राजकारण ते सांभाळायचे. त्यांचही काही वर्षांपूर्वी निधन झालं. माझ्याबरोबर एकदा एक दाक्षिणात्य पत्रकार होता. तो संभाजीरावाना इंग्रजीत म्हणाला मला मराठी समजत पण बोलता येत नाही. संभाजीराव त्याला लगेच म्हणाले मला इंग्रजी समजत पण बोलत येत नाही. अंगाला तेल लावून कुस्ती खेळणाऱ्या एक उत्तर भारतीय मल्लाला हौदातील माती त्याच्या पायावर टाकून पाय ओढून कस चित केलं हा किस्सा त्यांनी मला एकदा ऐकवला होता. माझे आणि त्यांचे फार चांगले संबंध होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी असायची. पण एक दिवशी मुलीचा अपघाती मृत्यू झाला.पिस्तूल साफ करत असताना गोळी लागल्याचं त्यांनी नंतर मला सांगितले. कारण काहीही असो. पण पैलवान खचले होते. चेहऱ्यावर दिसत होतं. जनता दलातील त्यांचे खांदे पाठीराखे रामकृष्ण हेगडे यांच्यानंतर समाजवादी मंडळींच्या या पक्षात त्यांना भविष्य दिसत नव्हतं.त्यातच दादांचे दोन्ही भांडणारे नातू हयात नव्हते. त्यांच्या भांडणाचा लाभ त्यांना मिळत नव्हता. प्रतिक आणि स्व मदन पाटील या दादा घराण्याच्या दोन वारसांनी एकत्र राजकारण करण्याचं ठरवलं. त्यामुळे शेवटी संभाजीरावानी भाजपचा हात धरला.पण तो त्यांचा शेवटचा प्रयत्न ठरला!आता उरल्या आहेत फक्त आठवणी!
