कटाक्ष:डेलकरआणि इतर हिंसा! फॅसिस्ट परंपरा! जयंत माईणकर

0
505

कटाक्ष:डेलकरआणि इतर हिंसा! फॅसिस्ट परंपरा! जयंत माईणकर

जपानच्या इतिहासाची पानेे चाळत असताना एका
गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले.मध्ययुगीन कालखंडात
जपानमध्ये हरलेल्या अनेक सामुराई योध्यानी हार आणि अपमान सहन न होऊन आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे.
हिटलरच्या दृष्टीने प्रत्येक हरलेल्या जनरलने आत्महत्या करायला पाहिजे होती. त्याच्या दृष्टीने त्याच्या हाताखालील जगप्रसिद्ध जनरल आणि त्याचा मित्र रोमेलने तीन वेळा आत्महत्या करायला पाहिजे होती. आणि शेवटी ती त्याने करवलीच. हरलेल्या हिटलरने शेवटी स्वतः ही आत्महत्या केलीच! हिटलरचे पूर्वज सुद्धा जपानी होते का हे बघितले पाहिजे! यातील गमतीचा भाग सोडा. पण उजव्या किंवा फॅसिस्ट विचारसरणीच्या हिटलरच्या राज्यात आत्महत्या आणि तुरळक पण धडकी भरवणारी हिंसा हा अविभाज्य घटक होता.
फॅसिझम म्हणजे; एका स्वयंघोषित आधुनिक संस्कृतीनुसार सामाजिक संबंधांची पुनर्रचना करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी अधिकारशाहीद्वारे एका नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचे ध्येय;अद्भुतरम्य प्रतीकवादाचा राजकीय सौंदर्यदृष्टिकोन, सामान्य जनतेला संघटित करून चळवळीत कामी लावणे, हिंसेकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि पुरुषीपणा, तारुण्य आणि चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाचे समर्थन. या सर्व गोष्टी संघ परिवारात ठासून भरलेल्या दिसतील.

उजव्यांच्या आणि डाव्यांच्या हिंसेत एक मूलभूत फरक आहे.डावे किंवा कम्युनिस्ट सत्तेवर येण्यासाठी आपल्या विरोधकांच शिरकाण करून सत्तेवर येतात आणि नंतरही विरोध करणाऱ्याला मारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सोव्हिएत युनियन, चीन, क्युबा आणि उत्तर कोरिया यांचा आजवरचा इतिहास बघितला तर माझ्या वाक्याची सत्यता पटेल.
उजव्या किंवा फॅसिस्ट लोकांची पद्धत जरा निराळी! ते सत्तेवर येतात लोकांना भावनिक साद घालून! निवडणुकीद्वारे! आणि नंतर कायद्याच्या संरक्षणाखाली किंवा कायदेशीर रित्या आपल्या विरोधकांना संपवतात. हिटलर ने साद घातली होती जर्मनीचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी आणि ज्यू विरोधाची! आणि १९३३ ला सत्तेवर आल्यानंतर ज्यू विरोधी हिंसा सरकारी संरक्षणाखाली सुरू झाली होती. गेस्टापोंच्या हातानी! ती शेवटी हिटलरच्या आत्महत्येने थांबली.
सध्या जगातली सर्वात मोठी फॅसिस्ट संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! संघ आणि त्याची राजकीय संघटना भाजप यांनी १९८९ साली हिंदुत्व आणि मुस्लिम विरोधाला राम मंदिराची भावनिक साद घातली आणि त्याच्याच भरवशावर आज ते सत्तेवर आहेत. पण १९८९ पासूनचा या आंदोलनाचा इतिहास पाहिला तर तो हजारो लोकांचे प्राण घेणारा रक्तलांछित आहे हेच दिसेल. यात केवळ दंगलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच नव्हे तर त्यांच्याच पक्षाच्या हरेन पंड्या यांचा खुन किंवा अनेकांना संशयास्पद वाटणारा गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू अशा घटनांचाही समावेश आहे.
हे सगळं आज आठवायचं कारण दादरा नगर हवेली या केंद्रशासित भागाचे १९८९ पासुन आजपर्यंत सात वेळा खासदार राहीलेले मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलात केलेली आत्महत्या आणि मनसुख हिरेन यांचा खून!
डेलकरांचे वडील खासदार होते. गुजराती आदिवासी असलेले डेलकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेसबरोबर सुरू झाला. पुढे स्वतः चा पक्ष त्यानंतर भाजप आणि सध्या जनता दलामध्ये ते सामील झाले होते. केंद्रशासित प्रदेशात प्रशासक म्हणून आयएएस दर्जाचे अधिकारी नेमले जातात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नियमाच सरळ उल्लंघन केलं आणि प्रफुल खोडा पटेल नावाच्या आपल्या मर्जीतील माजी आमदाराला प्रशासक नेमले.या पटेलांनी डेलकराना इतका ‘त्रास’ दिला की त्यांनी शेवटी मुंबईत येऊन दहा पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. मुंबईत आत्महत्या केल्यामुळे आपल्याला न्याय मिळेल ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या मतदारसंघात प्रशासकामुळे न्याय मिळणारं नाही याची त्यांना खात्री होती, अस ते लिहितात.उजव्यांच्या हिंसेचा नवा प्रकार! या घटनेची चौकशी सध्या एसआयटी करत आहे. याच दरम्यान जगातील अति श्रीमंत व्यक्ती आणि मोदींच्या खांद्यावर हात ठेवून बोलणारे मुकेश अंबानी यांच्या मलबार हिलस्थित प्रसिद्ध अॅंटीलिया या २७ मजली घरापासून एक किमी अंतरावर जिलेटीन आणि इतर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी मिळाली. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन हासुद्धा मिळाला. पण त्यानी आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार केल्याचं सांगितले. त्यानंतर रोज हिरेनची पोलीस चौकशी सुरू झाली. आणि एक दिवशी हिरेन पुन्हा पोलीस चौकशीसाठी बाहेर पडले आणि त्यांचा मृतदेह रुमाल तोंडाला बांधलेल्या अवस्थेत सापडला. परिस्थितीजन्य पुरावा खुनाकडे निर्देश
करत आहे. पुन्हा एकदा हिंसा! या प्रकरणात सचिन वाझे नावाच्या शिवसेनेशी जवळीक असणाऱ्या एका दुय्यम दर्जाच्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यावर भाजपने शरसंधान केलं आणि त्या एनआयए नी अटक सुद्धा केली. शिवसेनेने मुंबई पोलीस याकामी योग्य तपास करत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनआयए कडे तपस देण्याबाबत निषेध नोंदवला. आहे. एक प्रकारे केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाची चिन्हे! प्रश्न हा आहे की एवढी सुरक्षा असताना सीसीटीव्ही आणि डिजिटायझेशन काळात गाडी अंबानीच्या घरापर्यंत पोचू कशी शकली आणि हिरेन यांचा खून कोणी केला? तुरळक वाटणार्या या सर्व घटनांचा नीट अभ्यास केल्यास त्याच्या तारा अनेक ठिकाणी तथाकथित रीतीने केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी जुळतात. गुजरातचे माजी गृहमंत्री आणि तोगडिया समर्थक गोरधन झडफिया यांचं याविषयीच एक वाक्य फार महत्त्वाचे आहे. मोदींचे राजकीय विरोधक आणि भाजपचे नेते हरेन पंड्या यांच्या खुनाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘ मी अस म्हणणार नाही की मोदी पंड्यांच्या खुनाला जबाबदार आहेत. पण एक वस्तुस्थिती आहे की भाजपमधील ज्या व्यक्तीने मोदींच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती एकतर संपली किंवा त्या व्यक्तीच राजकीय जीवन संपल.
झडफिया यांचं वाक्य अगदी बरोबर आहे. मोदींना विरोध करणाऱ्या पंड्या यांचा खून झाला तर त्यांचे पक्षातील दुसरे विरोधक आणि संघ नेतृत्वाचे निकटवर्ती संजय जोशी भाजपमधून फेकले गेले आहेत. आज ते स्वतः च अस्तित्व शोधत आहेत.

लक्षणीय गोष्ट ही की मोदींशी वितुष्ट आल्यानंतर तोगडिया अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. पक्षातील आपल्या विरोधकांच्या बाबतीतसुद्धा उजव्या फॅसिस्ट विचारसरणीचे लोक , नेतेमंडळी कुठल्या थराला तथाकथित रित्या जाऊ शकतात याच उदाहरण दाखवून देणाऱ्या या घटना!
अशा प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करणारे फॅसिस्ट विचारसरणीचे लोक मला भेटले आहेत. त्यांच्या दृष्टीने अशाच प्रकारची हिंसा किंवा हत्या आर्य चाणक्याने करवली आणि म्हणूनच चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनू शकला.एका व्यक्तीने तर राम मंदिर आंदोलनाची तुलना युद्धाशी करत सैनिक बळी पडतातच अस सांगण्याचा प्रयत्न केला. डाव्या-मध्यममार्गी-अहिंसक विचारसरणीकडे झुकलेल्या मला ही उदाहरणे अर्थात पटली नाहीत. मानवी उत्क्रांती सुरू झाल्यानंतर किंवा मध्ययुगीन कालखंडात सर्वमान्य असलेली हिंसा आजच्या विज्ञान युगात, मानवी हक्क, समाजवाद यांची पायमल्ली करत अस्तित्वात राहते आणि त्याला फॅसिस्ट विचारसरणीच्या लोकांकडून पाठिंबा तर मिळतोच पण त्याचबरोबर आज देशात त्या विचारसरणीचे लोक सत्तेवर असल्याने कायद्याचं संरक्षण मिळत आणि कायद्याच्या आड लपून हिंसाही केली जाते. आणि सत्ताधारी अशा हिंसक घटनांचं ऐतिहासिक दाखले देऊन संरक्षण करतात. जुन्या काळी एखादी चूक घडली म्हणून तशीच चूक पुन्हा करण्याची मुभा कायदा देत नाही, हा साधा नियम या लोकांना माहीत नसावा हे दुर्दैव! राम मंदिर आंदोलनापासून अगदी डेलकर, हिरेन यांच्या आत्महत्या, खुनापर्यंत सर्वच घटना निषेधार्हच आहेत. हिंसेला नेहमीच टाळल पाहिजे. आणि सत्तेवर असणाऱ्यांनी तर कधीही हिंसेच किंवा कायदा मोडणाऱ्यांचं समर्थन करू नये! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here