भ. बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची महानगर प्रशासनाकडुन घोर विटंबना
सचिन उपरे

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी लोकवर्गणीतून भ. बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा स्थानिक बिरसा मुंडा चौकात दि. २१ फरवरीला स्थापित केला होता. परंतु कसलीही पुर्वसुचना न देता महानगर प्रशासनाने तो पुतळा उचलुन नेला व चबुतऱ्याची तोडफोड करुन जमिनदोस्त केला. महानगर प्रशासनाची ही कृती अतिशय निंदनिय व समाजविघातक अशी कृति आहे. भ. बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान असुन प्रेरक व्यक्तिमत्व आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे. अशा या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे महापाप नगर प्रशासनाने केले आहे. ही अतीशय निंदनिय कृती असुन भ. बिरसाच्या विचाराला व कार्याला मानणाऱ्या तमाम बहुजन समाजाची मने दुखावल्या गेली आहेत.
या कृत्याच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी दि. ५ मार्चपासुन भ. बिरसा मुंडा चौकात बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. हा फक्त आदिवासी बांधवांचाच अपमान नसुन भ. बिरसाला मानणाऱ्या तमाम बहुजनांचा अपमान आहे. आदिवासी समाज हे खपवून घेणार नाही. महानगर प्रशासनाने भ. बिरसा यांचा पुतळा ससम्मान त्याच चौकात बसवून द्यावा अन्यथा प्रचंड जनआंदोलन करण्याचा इशारा आदिवासी समाजातर्फे देण्यात आला आहे.