माथरा पाणीपुरवठा नळयोजना ठरणार दिवास्वप्नच!
पाण्याच्या टाकीचे बांधकाम १२ वर्षांपासून रखडले

नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार केव्हा….?
राजुरा/विरेंद्र पुणेकर । माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या १२ वर्षांपासून गावकऱ्यांना पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनाने आणल्याने आता उन्हाळा सुरू झाल्यानंतरही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल १२ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठा सारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या मूलभूत योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्विचरूम विषयी गावकऱ्यात चांगलाच वाद चिघडला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. माथरा वासियांना लवकर पाणी मिळावे यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली. आता आपल्या घरापर्यंत पाणी पुरवठा नळ योजनेचे पाणी पोहचेल म्हणून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागल्याने गावकऱ्यांच्या भल्यासाठी राबविलेली चांगली योजना शासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कुचकामी ठरली आहे. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून माथरा वासियांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
“माथरा येथे १२ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.”
लहुजी चहारे
माजी सरपंच, माथरा
नळयोजना तातडीने सुरू करा : माथरा पाणीपुरवठा नळ योजनेच्या अपूर्ण असलेल्या टाकीचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. गावकऱ्यांनी अनेकदा सबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. परंतु तब्बल १२ वर्षाचा कालावधी निघून गेला तरी अजूनही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून तातडीने पाणीपुरवठा नळ योजना सुरू करावी अशी मागणी माथरा येथील गावकऱ्यांनी केली आहे.