तलाठ्याच्या आशीर्वादाने दिवसरात्र रेती चोरटे सैराट
राजुरा । धानोरा तलाठी साजा अंतर्गत कविटपेठ येथे शेतशिवारालगत असलेल्या नाल्यात पुरेशा प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे. येथील रेतीवर स्थानिक ट्रॅक्टर मालकांची नजर असून लवकर बक्कळ पैसे कमविण्याच्या नादात रेतीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेती तस्करीकडे ट्रॅक्टर मालकांनी आपला मोर्चा वळविला आहे. स्थानिक तलाठी यांना याविषयी माहिती दिली असता. त्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष न देता संबंधित ट्रॅक्टर मालकांशी हात मिळवणी करून लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडवून स्वतः माया जमविण्यात मश्गुल असल्याची शंका आहे.
मागील काही आठवड्यांपासून या नाल्यावर दिवस-रात्र ट्रॅक्टर ने रेतीची वाहतुक सुरु आहे. या गंभीर प्रकाराची माहिती स्थानिक तलाठी यांना दूरध्वनीद्वारे दिली असता त्यांनी या रेती तस्करांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट त्यांची पाठराखण करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रोज बिनभोभाटपणे रेतीची तस्करी सुरूच आहे. यामुळे तलाठ्याचे ट्रॅक्टर मालकांशी आर्थिक हितसंबंध असल्याने रेती तस्करांची मनमानी सुरु असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांत चांगलीच रंगली आहे. या गंभीर प्रकारावर तहसीलदार यांच्याकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे स्थनिक जनतेचे लक्ष लागले आहे.
