कटाक्ष:राहुल गांधी, आणीबाणी आणि संघ परिवार! जयंत माईणकर

0
484

कटाक्ष:राहुल गांधी, आणीबाणी आणि संघ परिवार! जयंत माईणकर

आणीबाणी लागू करण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निर्णय चुकीचा होता आणि १९७५ ते ७७ च्या दरम्यान आणीबाणीच्या 21 महिन्यांच्या काळात जे काही घडलं ते चुकीचं होतं. मात्र त्या वेळी काँग्रेसने भारताची संस्थात्मक रचना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. काँग्रेसची विचारसरणी आम्हाला असं करण्याची परवानगी सुद्धा देत नाही अस कोर्नल विश्वविद्यालयात प्रोफेसर आणि भारताचे पूर्व मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेल्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांच्याशी बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच वाक्य त्यांच्या परिपक्वतेची आणि दूरदृष्टीची जाणीव करून देतात.

घराणेशाही आणि आणीबाणी ! काँग्रेसवर टीका करत असताना संघ परिवाराची दोन प्रमुख शस्त्र!

आणीबाणीविषयी२४ जानेवारी १९७८ रोजी यवतमाळ येथील विस्तीर्ण पोस्टल ग्राऊंडवर जांबुवंतराव धोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत स्वतः इंदिराजींनी माफी मागितली होती. त्या सभेला त्यावेळी आठव्या वर्गात शिकत असलेला मी हजर होतो. त्यावेळी खासदारही नसलेल्या इंदिराजी पुढे चिकमंगळूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आणि १९८०ला त्या पुन्हा सत्तेवरही आल्या . आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदिराजींनी स्वतः आणीबाणी उठवली आणि निवडणुकीला सामोऱ्या गेल्या.

संघ परिवाराकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आणि त्यातही एकाच घराण्याच्या (नेहरू -गांधी) हातात देशाची सूत्रे ठेवण्यासाठी अट्टाहास केल्याचा आरोप केला जातो. याविषयीचा प्रश्न स्वतः राहुल गांधींना मी विचारलं होता. २०१४ साली मुंबईतील ५० संपादकांना राहुल गांधींनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचा ब्युरो चीफ या नात्याने मला त्या बैठकीत बोलावण्यात आले होतं. प्रत्येक पत्रकाराला एक किंवा दोन प्रश्न विचारण्याची मुभा होती. पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत राहुलजींची पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देण्याची हिंमत त्यांचं वेगळेपण दाखवून देत होती. त्यावेळी मी त्यांना घराणेशाहीविषयी प्रश्न विचारला होता.बाजूला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. पण माझ्या प्रश्नावर न चिडता राहुल गांधींनी भाजपपासून सर्व पक्षात कशी घराणेशाही आहे हे शांतपणे नेत्यांची नाव घेऊन सांगितले. घराणेशाहीचा आरोपात आता अर्थ नाही कारण १९८९ पासून ३२ वर्षे कोणतीही गांधी व्यक्ती पंतप्रधानपदी नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

आणीबाणीच्या काळात राज्य घटनेने दिलेले अधिकार आणि नागरी स्वातंत्र्यावर गदा आली होती, प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्यात आले होते आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर तुरुंगात बंद करण्यात आलं होतं.

१९७१ च्या बांगला देश युद्धानंतर इंदिराजींची लोकप्रियता कळसाला पोचली होती.पण बांगला देशाच्या निर्मितीमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणलेलेच होते. त्याच काळात अमेरिकेचे उपाध्यक्ष चार्ल्स आग्न्यू याना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

काही दिवसातच अध्यक्ष रिचर्ड निक्सनसुद्धा वॉटर गेट प्रकरणात अडकले आणि फेडरल कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी राजीनामा दिला.याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. ज्या बांगला देशाची निर्मिती आपण केली त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा खून याच काळात झाला. अशाच प्रकारच्या हिंसक घटना भारतातही होऊ शकतात अशी भिती वाटत असल्यामुळे सुद्धा असेल, पण इंदिराजींनी आणीबाणीचा निर्णय घेतल्याचे बोललं जातं. याच काळात जॉर्ज फर्नांडिस मुख्य आरोपी असलेली बडोदा डायनामाईट केस उघडकीस आली होती. आणि याच काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय इंदिराजींच्या विरोधात लागला. आणीबाणी लावण्याचं हे तत्कालीक कारण मानलं जातं.त्याहीवेळी इंदिराजींना न्यायालयाचा आदेश मानून राजीनामा द्यावा आणि दरम्यान सर्वोच्च न्यायालयात अपील करावं असं सल्ला देण्यात आला होता. पण तो सल्ला न मानता त्यांनी आणीबाणी लावणं स्वीकारले आणि नेमकी तीच त्यांची घोडचूक ठरली. पण आपल्या हातून घडलेल्या चुकीची कबुली खुद्द इंदिरा गांधींनी दिली होती. पण संघ परिवार नेहमी आणीबाणी काळातील अत्याचारांचा दाखला देत काँग्रेसवर टीकास्त्र सोडतात.

*आणीबाणीपासून अनेक मध्यमवर्गीय शिक्षित मतदार कॉंग्रेस विरोधक झाले . पण हेच मतदार २०१९ पासून हळूहळू काँग्रेसकडे परतत आहेत.आता राहुल गांधी यांच्या वक्तव्याने या मंडळींच्या मनातील उरलासुरला कांग्रेसविरोधही मावळायला मदत होईल.*

आणीबाणीमुळेच विरोधकांची एकजूट झाली आणि रा . स्व . संघाला प्रतिष्ठा मिळाली. मृणाल गोरे , मोहन धारिया , मधू लिमये वगैरे सर्व मंडळी जे सांगत होती ते बरोबर होते हे आता लोकांना कळत आहे . दुहेरी निष्ठा असा शब्दप्रयोग त्या वेळी होत असे . त्याचा अर्थ आज समजतो. कारण ‘hidden agenda’ हळूहळू नोटबंदी, गोहत्या, सीएए , एन आर सी या रूपानेबाहेर निघत आहे.

ही कबुली आता देण्यात काय अर्थ आहे असे काही जण विचारतात . चूक आहे अशी खात्री झाली असेल तर ती कबूल करण्यासाठी मुहूर्त शोधण्याची काहीच गरज नाही.

अनेक जणाना यातून योग्य तो संदेश मिळाला असेल असे मला वाटते.

राहुल गांधी याना तामिळनाडूत प्रचाराला बंदी घाला असे भाजप निवडणूक आयोगाला सांगत आहे यावरूनच भाजपने राहुल गांधींचा धसका घेतला आहे असे दिसते . कॉलेजमधील तरुण – तरुणीशी प्रश्नोत्तरे आणि विद्वान लोकांशी चर्चा याचा परिणाम संपूर्ण भारतभर पोचला आहे . लोकाना आता राहुल गांधी यांचेमध्येच पर्याय दिसू लागला आहे !

आज मोदी सर्व बाजूनी घेरलेले दिसत असताना राहुल गांधींनी आपल्या राजकीय परिपक्वतेच दर्शन देत आणीबाणी ही एक चूक असल्याची कबुली देत संघाच्या हातातील काँग्रेसवर टीका करण्याचं एक शस्त्र निकामी केलं आहे. नोटबंदी पासून अगदी आतापर्यंतच्या शेतकरी आंदोलनापर्यंत मोदी सरकारच्या लोकप्रियता दिवसेंदिवस कमी हात आहे.२०१९ला कामी आलेलं हिंदुत्व सुद्धा २०२४ ला कामी येण्याची शक्यता कमी आहे.अशावेळी आणीबाणी आणि घराणेशाही या दोन शास्त्रांचा संघ परिवार करण साहजिकच आहे. पण आणीबाणी ही एक चूक होती हे सांगून राहुल गांधींनी संघ परिवाराच्या हातातील या शास्त्राची हवाच काढून घेतली आहे. तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here