क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याची मनपाची कारवाई निषेधार्ह

0
508
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याची मनपाची कारवाई निषेधार्ह
रामू तिवारी यांचा आरोप; शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आदिवासी समाजाच्या पाठिशी
चंद्रपूर : शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील चौकात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा स्थापन करण्यात आला होता. आदिवासी समाजबांधवांनी आपापल्या परीने वर्गणी गोळा करून पुतळा उभारला. मात्र, महापालिका प्रशासनाने आदिवासी समाजाला कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळा हटविण्याची कारवाई केली आहे. पुतळा हटविण्याची कारवाई निषेधार्ह असून, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आदिवासी समाजबांधवांच्या पाठिशी असल्याचा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजाचेही या जिल्ह्यात वास्तव्य होते. अनेक प्राचीन वास्तू, स्मारके या इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक, पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील विविध संघटना, समाजबांधवांच्या वतीने केली जात आहे. त्यासोबतच शहरातील चौकांना महापुरुषांची नावे देण्याचीही मागणी केली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. धरणे देण्यात आले. महापौर, आयुक्तांपासून जिल्हाधिका-यांपर्यंत सर्व मोठ्या अधिकारी, नेत्यांना निवेदने देण्यात आली होती.
त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती. आदिवासी समाजाने या चौकात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजबांधवांनी आपापल्या परीने वर्गणी गोळा करीत पाच फुट उंचीचा पुतळा उभारला. आता मार्च महिन्यांत या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली. अशात २७ फेब्रुवारीला कोणतीही सूचना न देता पुतळा हटविण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून करण्यात आली. या प्रकाराची माहिती होताच आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधवांनी धाव घेतली. मात्र, प्रशासनाने या समाजबांधवांचची भावना समजून घेतली नाही.
महापालिका प्रशासनाने पुतळा हटविण्याची केलेली कारवाई निषेधार्ह आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आदिवासी समाजबांधवांच्या पाठिशी आहे. आदिवासी समाजाच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यात येत असून, त्यासाठी पक्षाच्या वतीनेसुद्धा आंदोलन केले जाईल. यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही श्री. तिवारी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here