राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आज
“शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
चंद्रपूर । किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
दिल्ली येथे आंदोलानाच्या रणसंग्रामात उतरलेल्या देशभरातील शेतऱ्यांना पाठींबा देण्याच्या उदात्त हेतूने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 26 फेब्रुवारीला दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करुन देशव्यापी निषेध दिन साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने ना. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
देशाच्या राजधानीच्या सीमेवर अन्नदाता शेतकऱ्यांच्या संघर्षास अडीच महिने पूर्ण झाले असून केंद्र शासनाने आडमुठेपणे लादलेल्या तीन कृषी कायद्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. केंद्र शासनासोबत शेतकऱ्यांच्या नेत्यांसह आतापर्यंत चर्चेच्या नऊ अनिर्णित फेऱ्या पार पडल्या आहेत.
केंद्र शासन, शेतकरी संघटना नेत्यांना सतत चर्चेला बोलावते यावरुन दिल्ली सीमेवरील सर्व आंदोलक हे शेतकरी आहेत हे केंद्राने मान्य केले आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी बांधवांप्रती सरकारी कर्मचाऱ्यांची बांधीलकी दर्शविण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्दबातल करण्यासाठी देशभरातील बळीराजांचे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या संघर्षाला पाठींबा व्यक्त करण्यात आला व देशव्यापी निषेध दिन साजरा करण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे व अध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी आपल्या मनोगतातून कृषी कायदे व शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी आपले विचार मांडले.
या निदर्शने कार्यक्रमास महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगीक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, आरोग्य विभाग आदी विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, रमेश पिंपळशेंडे, राजु धांडे, संतोष अतकरे, सीमा पॉल, रजनी आनंदे, एस. आर. मानुसमारे, गणेश मानकर, महेश पानसे, शैलेंद्र धात्रक, रविंद्र आमवार, प्रवीण अदेनकीवार, अतुल साखरकर, अमोल अवधाने, श्रीकांत येवले, नितीन पाटील, अनंत गहुकर, अविनाश बोरगमवार, संदीप गणफाडे आदी व त्याचबरोबर विविध कार्यालयीन संघटनांनी या निदर्शने कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.