सर्वेक्षण, चाचणी आणि संपर्क तपासणीवर भर द्या – पालकमंत्री ना. बच्चू कडू

0
368

 

अकोला,दि.२७(जिमाका)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण, त्यांनतर संदिग्ध वाटणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या आणि त्यातून पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंची तपासणी या तीन महत्वाच्या टप्प्यावर भर दिल्यास कोरोना संसर्गाचा फैलाव आपण रोखू शकु, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ना. कडू बोलत हेाते. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील तालुक्यांची ठिकाणे व ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने गावनिहाय संदिग्ध व जोखीमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करणे. त्यातील संदिग्ध वाटणाऱ्या लोकांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या करुन घेणे. त्यानंतर त्याच्यातील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंच्या चाचण्या कराव्या व आवश्यकतेनुसार उपचारासाठी क्वारंटाईन करणे इत्यादी उपाययोजना कराव्या, असे निर्देश देण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर अशा सर्वेक्षण व तपासण्यांचे नियोजन करुन तपासण्या सुरुही आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३२ मोठया गावांमध्ये तीन हजारांहून अधिक तपासण्या येत्या पाच दिवसांत करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध उपचार सुविधा, औषधीसाठा याबाबतही आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here