कटाक्ष:नाना नावाचं वादळ! जयंत माईणकर
“नाना, भाजपच्या२८२ खासदारांमधून तुम्ही एकट्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीला आव्हान देण्याची हिम्मत दाखवली आणि तेसुद्धा शेतकरी आणि ओबीसी यांच्या प्रश्नावरून याबद्दल तुमचं अभिनंदन!” मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलात कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसलेल्या नानांना मी म्हणालो.

“जयंतराव, चॅनेल्स वरील चर्चेत आणि आपल्या कॉलम मधून तुम्ही पण मोदी सरकारचे वाभाडे काढताच की!”, नाना मला हसत म्हणाले. वर्ष होत २०१८! नानांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
नाना पटोले! जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हा त्यांचा राजकिय प्रवास! कधी अपक्ष म्हणून लढणाऱ्या नानांच मूळ काँग्रेसमधलच! अगदी एन एस यु आय पासून! मध्ये काही काळ भाजपमध्येही होते. पण त्यांना तो पक्ष आणि तिथली हुकूमशाही त
मानवली नाही. आणि अगदी नितीन गडकरींपासून सर्व भाजपचे नेते मोदींसमोर ‘ब्र’ सुद्धा काढण्याची हिम्मत करत नसताना कुणबी समाजातील या शेतकरी नेत्याने ओबीसी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न विचारू न देण्याबद्दल चक्क मोदींनाच आव्हान देत संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं! अर्थात राहुल गांधीचंही या घटनाक्रमाकडे लक्ष होतच. त्यांनी अर्थातच नानांना पक्षात घेतलं!
मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाही किंवा ते पत्रकारांच्या किंवा कोणाच्याही प्रश्नांना घाबरतात किंवा एकूणच संघ परिवारात नेत्याला प्रश्न विचारणे महापातक मानलं जात असल्यामुळे असेल पण त्यांना पटोलेंचे ओबीसी आणि शेतीविषयक प्रश्न रुचले नसतील. ‘मी स्वतः खालच्या जातीचा आहे’ याचा वारंवार उल्लेख करणाऱ्या मोदींना ओबीसी विकासाचा प्रश्न विचारणारे किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणारे पटोले आवडणं शक्यच नव्हतं.कारण आपल्या भाषणावर कुठलाही उपप्रश्न विचारण मोदींना खपत नाही किंवा त्यांना उत्तरे देत येत नाहीत! पण पटोलेंना हा अपमान रुचला नाही. त्यांनी लगेच खासदारकीचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला. त्यांना काँग्रेसने नागपुरातून गडकरींच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरवल.भलेही त्यांचा पराभव झाला असेल पण नानांनी चांगली लढत दिली हे खुद्द गडकरीही मान्य करतील. विधानसभेत मात्र नाना साकोली मतदारसंघातुन प्रवेश करण्यात यशस्वी ठरले.आणि तिन पक्षांची युती होताच काँग्रेसच्या वाट्याला आलं विधानसभेचे अध्यक्षपद!कार्यकर्ता आणि नेता यांची कदर करणाऱ्या राहूल गांधींनी लगेच अध्यक्षपदी वर्णी लागली नानांचीच! आपल्या अवघ्या १४ महिन्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नानांनी आपला ठसा उमटवला.मग तो ओबीसी समाजाची जनगणनेेविषयी विधानसभेत त्यांनी स्वतः मांडलेला ठराव असेल किंवा चक्क राज्याच्या मुख्य सचिवांना उशिरा माहिती देण्यास जबाबदार धरून माफी मागण्यास सांगणं असेल किंवा आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या घरी पत्र आणि त्याचबरोबर विधानसभेच चित्र असलेला मेमेंटो पाठवणं असेल किंवा आरडाओरडा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ ए, देवेंद्र खाली बस अस सांगणं असू दे, नानांनी प्रत्येक वेळी आपलं वेगळेपण दाखवून दिले. नाना काँग्रेसमध्ये आल्यापासूनच त्यांचं नाव भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलं जातं होत. पण कोरोना किंवा इतर कारणांमुळे असेल त्यांना हे पद मिळायला फेब्रुवारी २०२१ उजाडायला लागलं. आता हे पद त्यांच्याकडे पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत राहील आणि विधानसभा निवडणुकीत तिन पक्षांच्या युतीच्या साह्याने काँग्रेसने भरघोस यश मिळवले तर विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाची पर्यायाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पटोलेंकडे येऊ शकते. आणि त्यांच्यात ती जबाबदारी पेलण्याची ताकद निश्चित आहे. काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी ते निश्चित सर्व नेत्यांना आपल्या बरोबर घेत स्वतः ला झोकून देतील.
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव पुढे येत आहे. ह्या दोन्ही नावांचा आणि पुढील परिणामांचा अंदाज घेऊनच असेल राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष हा सर्वांचा असल्याने त्यावर तिनही पक्ष विचार करून निर्णय घेतील असा सावध पावित्रा घेतला. मात्र त्यावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अध्यक्ष पदाबरोबरच उपमुख्यमंत्री पदावरच दावा करत गुगली टाकला.पृथ्वीराज चव्हाण आणि पवार यांचा विळ्या भोपळ्याच सख्य सर्वश्रुतच आहे. आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात संग्राम थोपटेना पवार मोठं होऊ देतील का ही शंकाच आहे.पण काँग्रेस आपल्या या दोन नावांवर ठाम राहील अस दिसत आहे. आणि त्यामुळे त्याजागी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत पवारांना जेरीस आणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा नंबर लागू शकतो. स्वतः पवारसुद्धा थोपटेंच्या ऐवजी चव्हाणांना पसंती देतील. ७५ वर्षाच्या चव्हाणांनी याआधीच २०१९ ची निवडणूक त्यांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असेल असं घोषित केले आहे.
शिवसेनेने पाच वर्षाच अध्यक्षपदअसताना एक वर्षातच का राजीनामा दिला हा प्रश्न उपस्थित केला आहे. वास्तविक पाहता हा प्रश्न काँग्रेसचा पक्षांतर्गत असल्याने त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नव्हती. पण इथेच पवार ठाकरे यांची काँग्रेसची कोंडी करणारी युती दिसून पडते. पाच वर्षांकरता मनोहर जोशीना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर ते चार वर्षे पूर्ण होण्याच्या आत काढून घेऊन नारायण राणेंना देण्याचं काम याच पक्षानी केल्याचं ते सोयीस्करपणे विसरतात. पण पक्षासाठी राजीनामा देण्याची अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवसेनेला सध्या एकच लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेत पुढील वर्षी एकहाती सत्ता मिळविणे. मुंबईच राजकारण वेगळं आहे. ८२ जागा मिळवून भाजपने आज स्वतः च स्थान निर्माण केलं आहे.त्याला शह देण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी आपलीआघाडी कायम ठेवणं ही काळाची गरज आहे. नाना ही तारेवरची कसरत निट संभाळतीलच यात शंकाच नाही.
तूर्तास इतकेच!