कटाक्ष:संघधार्जिण्या आक्रस्ताळी पत्रकारांचा शिरोमणी- अर्णब गोस्वामी!
जयंत माईणकर
अर्णब गोस्वामी! रिपब्लिक या न्यूज चॅनेलच्या मालक-संपादकांच्या व्हाट्सएप चॅट मधून त्याला बालाकोट एअर स्ट्राईक, आणि काश्मीर मधील कलम ३७० हटविणे याविषयीची माहिती घटनेच्या आधीच होती हे सिद्ध होत. प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी या मंत्र्याबद्दलची तसच आप की अदालत फेम आणि स्व अरुण जेटलींचे कट्टर समर्थक रजत शर्मा यांच्याविषयीची अर्णब गोस्वामीची मतं त्याची केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारमधील पकडीविषयी बरीच माहिती देतात. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतुन पदवी मिळवून डायरेक्ट एनडीटीव्ही सारख्या मीडिया हाऊसमध्ये २००१ साली एन्ट्री घेऊन २००७ला टाइम्स नाऊ आणि नंतर चक्क स्वतःच चॅनेल काढेपर्यंत या महाशयांची २० वर्षातील मजल. त्याच्या वडलांनी आसाममधून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढविली यातच या व्यक्तीची विचारधारा दिसते. परदेशातून पदवी घेऊन आलेल्या तरुणांना एकदम उच्च पदावर बसविण्याची परंपरा अनेक मोठ्या इंग्रजी मीडिया हाऊसेस मध्ये आहे.राजदीप सरदेसाई, बरखा दत्त ही मंडळी ही त्याच पठडीतील. यांच्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्डमधील डिग्री आणि इंग्लिशवरील तथाकथित प्रभुत्व याच्या भरवशावर अत्यंत उथळ माहितीच्या आधारे ही मंडळी मोठी होतात. यांच्या परदेशी विद्यापीठातील पदव्यांसमोर आमची नागपूर विद्यापीठाची डिग्री म्हणजे नगाऱ्यापुढे टिमकी! जणू ही मंडळी पत्रकारितेतील आयएएस आणि आम्ही आपले पीएससी कॅडर वाले!पण मी स्व. अरुण साधूंच्या आशीर्वादाने उभा राहिलो. आणि कुठल्याही विषयाच्या सखोल माहितीच्या आधारे माझं वेगळेपण राखू शकलो. पत्रकारितेत संघ विचारसरणीच्या पत्रकारांचा शिरकाव हा प्रथमपासूनच होता. रजत शर्मानी ज्या जनार्दन ठाकूर यांच्याकडे उमेदवारी केली ते दोघेही याच विचारसरणीचे!
१९९० च्या दशकात भारतीय राजकारणात आणि माध्यमात दोन स्थित्यंतरे आली. बाबरी पतनानंतर भारतीय राजकारणात भाजपचं स्वतःच अस्तित्व निर्माण झालं आणि त्याच्याच भरवशावर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. १९९२ साली आलेल्या खाजगी मनोरंजन चॅनेल आणि १९९६ साली सुरू झालेल्या खाजगी न्यूज चॅनेलनी भारतीय माध्यमातही एक क्रांती घडवून आणली. रजत शर्मा, दीपक चौरसिया, सुधीर चौधरी हे संघधार्जिणे पत्रकारही याच काळात मोठे झाले. मात्र या आणि इतर संघ धार्जिण्या पत्रकारांनी इंग्रजीचाही सहारा घेतला नाही किंवा सखोल अभ्यासही केला नाही. ही मंडळी उभी राहिली केवळ आपल्या प्रत्येक शब्दातून प्रतीत होणाऱ्या कथित मुस्लिम द्वेषाच्या भरवशावर!
आम्हीच खरे राष्ट्रवादी , हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदु जगेगा तो देश जगेगा, आर्थिक दृष्टीने एक समृद्ध हिंदु राष्ट्र घडवायचे आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे आणि या सर्व नॅरेटिव्ह मध्ये ना बसणारे सगळे कसे राष्ट्र विरोधी शक्ती आहेत हे तुणतुणे वाजवायला ही मंडळी कधीही विसरत नाही. अनेकवेळा चर्चेत ज्या प्रकारे भारतावर सातव्या शतकात महंमद बिन कासीम यांनी केलेल्या पहिल्या आक्रमणापासून बहादूरशहा जफर पर्यंत विषय येतात तेव्हा अनेकदा मला आपण मध्ययुगीन काळात वावरत आहोत की काय असं वाटतं! २०१९ साली या सुधीर चौधरीनी मोदींच्या घेतलेल्या एका मुलाखतीची झलक वारंवार दाखवली गेली. मोदी पत्रकारांशी बोलत नाहीत. त्यांच्या आवडत्या आणि अडचणीचे प्रश्न न विचारणाऱ्या पत्रकारांना ते मुलाखत देतात. त्यात अग्रणी झी टीव्ही चे सुधीर चौधरी ! झी चे मालक सुभाषचंद्र आणि सुधीर चौधरी दोघेही संघधार्जिणे! त्यामुळे मुलाखत होणारच! या मुलाखतीत चौधरी एक प्रश्न विचारतात दिसतात.तुम्ही संपूर्ण भारत फिरलात! याच उत्तर देताना मोदी म्हणतात, होय मी भारतातील सर्व जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. मात्र यावर पुढचा उपप्रश्न येत नाही.तो म्हणजे या भेटी देऊन आपण काय केलत? अर्थात या प्रश्नाची सुधीर चौधरींकडून अपेक्षाही नाही!मी जर त्याजागी असतो तर लगेच हाही उपप्रश्न विचारला असता की ज्या जिल्ह्यात आपण भेटी दिल्या तिथे दंगली झाल्या ही वस्तुस्थिती नाही का? आपण मूळ विषय अर्णबकडे वळू या! बाहेर आलेल्या व्हाट्सएपच्या चॅटनुसार हे महाशय
या सर्व संघधार्जिण्या पत्रकारांचे शिरोमणी किंवा सरगाणा मानले पाहिजेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना ‘दहशतवादी’ म्हणणारे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर कितीही चुकले असले किंवा ते कितीही तथाकथित ‘useless’ असले तरीही मी त्यांना ‘useless’ म्हणणार नाही. कारण शेवटी तो त्यांच्या पदाचा मान असतो. पण जावडेकर तरी काय करणार? नितीन गडकरीना रोखण्यासाठी मोदी त्यांचा वापर करत आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.त्यामुळे तोंड गप्प ठेऊन मंत्रिपद शाबूत ठेवण्यापालिकडे ते तरी काय करू शकतात? डिजिटायझेशनमुळे खाजगी गप्पा केव्हाही व्हायरल होऊ शकतात याची जाणीव अर्णबपासून प्रत्येक वाक्यात एक ‘शिवी’ देण्यात धन्यता मानणाऱ्या संस्कृतीनिष्ठ पक्षातील वजनदार नेत्यांपर्यंत सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे. पण सत्तेचा आणि सत्तेशी जवळीक बाळगणाऱ्या व्यक्तींचा माज अशा व्हाट्सएपच्या चॅट मधून किंवा शिव्यांमधून प्रतीत होत असतो. रजत शर्मा जरी अतिशय शांतपणे प्रश्न विचारत असले तरीही भाजपचे सध्या अडगळीत पडलेले नेते आणि मोदींचे शत्रू संजय जोशी यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची बातमी रजत शर्मानी ज्या पद्धतीने सांगितली ते पाहून त्यांचा जोशी विरोधी आणि मोदींकडचा कल उघड दिसत होता. तर दीपक चौरसिया यांचा आक्रस्ताळीपणा आणि दुसऱ्याला बोलू न देता आपला मुद्दा रेटण्याचा प्रयत्न दिसून पडतो.पण या सर्वांवर कडी केली ती अर्णबनी! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून! ‘Nation wants to know’ or Arnab wants to shout’ ज्याला अनेक जण bark म्हणतात. स्वतः ला मोठं समजताना इतर पत्रकार आपल्याहून कसे कमी दर्जाचे हेही सांगायला अर्णब विसरत नाहीत. स्वतः ला राष्ट्रभक्त,आणि ज्ञानी समजण्याची ही संघ परिवाराची स्टाईल! आणि हे दाखविताना आपणच कसे श्रेष्ठ हे ठासून सांगण्याची प्रवृत्ती!
देशात काँग्रेस, हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट, समाजवादी आणि प्रादेशिक असे पाच प्रकारचे पक्ष आहेत आणि या पाच प्रकारच्या राजकीय पक्षांची तळी उचलून धरणारे पाच प्रकारची मीडिया हाऊसेस सुद्धा आहेत. त्यात गैर काहीच नाही. हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करण म्हणजे देशद्रोह असही मी म्हणणार नाही. मात्र केवळ आमचेच विचार चांगले आणि इतर सर्व विरोधक देशद्रोही हे म्हणण्याचा अधिकार या हिंदुत्ववाद्यांना नाही. त्याचबरोबर तद्दन खोट्या बातम्या ‘सत्यतेचा’ आव आणत एखाद्या माफिया डॉन किंवा माहितीच्या डॉन प्रमाणे पसरवणे याचाही अधिकार नाही, हे मी जरूर म्हणीन! अर्णबला बालाकोट एअर स्ट्राईक विषयी आधीच माहिती असणे किंवा काश्मीरमधून कलम ३७० हटविणे याची माहिती असणं आणि त्याचा वापर त्यांनी व्हाट्सएप चॅट मध्ये करणं हे निश्चितच चूक आहे. पण यालाही जबाबदार मी पंतप्रधानांनाच धरीन. कारण त्यांच्या संमतीशिवाय कुठलीही बातमी मीडिया हाऊसला कळू शकते नाही. अनेकवेळा आपल्याला हव्या असलेल्या पक्षातील विरोधकांच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात.२०१४ साली सत्तेवर आल्यानंतर तथाकथित रित्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मुलाशी आणि एक आयपीएस ऑफिसारच्या बदलीविषयी झालेल्या कथित आर्थिक व्यवहाराची बातमी अशाच प्रकारे पेरल्या गेली होती.अर्थात ही पेरलेली बातमी पंतप्रधानांच्या कार्यालयाशीच संबंधित होती.एकूणच अर्णब सध्या रडारवर असला तरीही त्याच्या प्रत्येक कृतीमागे बोलविता धनी कोण आहे, कोणाच्या पाठिंब्याच्या भरवशावर अर्णब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उद्धव म्हणण्याची हिंमत करतो हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच! सुज्ञास अधिक सांगणे न लगे! तूर्तास इतकेच!