काँग्रेस कार्यकर्त्यांची आझाद बागेत गांधीगिरी

0
539

काँग्रेस कार्यकर्त्यांची आझाद बागेत गांधीगिरी

महात्मा फुले यांचा पुतळा, स्वातंत्र्य सेनानींचा फलक केला स्वच्छ

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. २५) आझाद बागेत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. बागेतील स्वातंत्र्य सेनानींच्या नामोल्लेखाचा कच-यात फेकलेला फलक चांगल्या ठिकाणी ठेवला. तर, धुळीने माखलेल्या महात्मा फुलेंचा पुतळा पाण्याने धुवून काढला. या गांधीगिरी आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापुरुष, स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृती जपण्याचा संदेश महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला दिला आहे.
शहराच्या मध्यभागी आझाद बाग आहे. शहरातील अबालवृद्ध येथे विरंगुळा म्हणून येत असतात. या बागेत महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आहे. त्यासोबतच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या शहरातील थोर स्वातंत्र्य सेनानींचा नामोल्लेख असलेला फलक आहे. सध्या बगीचाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान धूळ उडू नये म्हणून महापुरुषांचा पुतळा झाकणे अपेक्षित होते. त्यासोबतच स्वातंत्र्य सेनानींचा नामोल्लेख असलेला फलक चांगल्या ठिकाणी ठेवायला हवा होता. मात्र, याकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिका-यांचे साफ दुर्लक्ष झाले. त्यामुळे काम करणा-या कामगारांनी स्वातंत्र्य सेनानीचा नामोल्लेख असलेला फलक कच-यात फेकून दिला. तर, दुसरीकडे महात्मा फुले यांचा पुतळा धुळीने माखला आहे.
या प्रकाराची माहिती चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांना मिळाली. त्यानंतर तिवारी यांनी मनपा प्रशासनाकडे महापुरुष, स्वातंत्र्य सेनानीच्या स्मृती जपण्यासंदर्भात निवेदन देण्यापेक्षा स्वत: त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने महात्मा फुले यांचा पुतळा पाण्याने धुवून काढला. तसेच स्वातंत्र्य सेनानींचा नामोल्लेख असलेला फलक कच-यातून उचलून दुसरीकडे चांगल्या ठिकाणी ठेवला. तसेच महात्मा फुले यांचा पुतळा झाकण्यासाठी मनपाचे अभियंता विजय बोरीकर यांना कपडे भेट दिले. या गांधीगिरी आंदोलनामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाला चांगलीच चपराक बसली आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महिला अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष  अश्विनीताई खोब्रागडे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, किसान सेल अध्यक्ष भालचंद्र दानव, हर्षा चांदेकर, एकता गुरले, उषाताई धांडे, अश्विनी योगेश खोब्रागडे, मोहन डोंगरे, राजेश अड्डूर, प्रसन्ना शिरवार, राजेंद्र हजारे, स्वातंत्र्यता संग्राम सेनानी पाल्य संघटनेचे अध्यक्ष दिवाकर बनकर, गोपाल अमृतकर, पितांबर कश्यप, एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युथ काँग्रेसचे प्रदेश सचिव कादर शेख, रुपेश वासेकर, पप्पू सिद्दीकी, धरमू तिवारी, आयूष साखरकर, प्रतीक नगरकर, दादू दानव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here