बर्ड फ्ल्यु बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये- राहुल कर्डिले

0
449

बर्ड फ्ल्यु बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये- राहुल कर्डिले

चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : जिल्ह्यात सद्यस्थितीनुसार भद्रावती तालुक्याच्या पिरली येथील कुक्कुट पक्षामंधील दोन मृत पक्षी व राजुरा तालुक्याच्या बैलमपुर येथील चार मृत पक्षी रोग निदानाकरीता पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. पिरल येथील 2 पक्षांचा अहवाल नकारार्थी असून बैलमपूर येथील अहवाल प्रतिक्षेत आहे. मात्र मानोरा ता.बल्लारपूर येथील मृत 3 कावळ्यापैकी एक कावळा पुणे येथे होकारार्थी आढळला असला तरी भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग अन्वेषण संस्थान येथुन याबाबत अहवाल प्रतिक्षेत आहे. तरी बर्ड फ्ल्यु संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

बर्ड फ्ल्यु रोगाचा प्रादुर्भाव भारतात काही राज्यात व महाराष्ट्रात काही ठिकाणी आढळून आलेला असल्याने अंडी व पोल्ट्री मांसाकडे खवय्यांनी पाठ फिरविलेली दिसुन येत आहे. या पार्श्वभुमीवर भारत सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने 14 जानेवारी 2021 रोजी सर्व राज्यांना पत्र जारी करून अंडी व मांस यांचे सेवन मानवी आरोग्यास पुर्णपणे सुरक्षीत असल्याचे म्हटले आहे. बर्ड फ्ल्यु हा रोग H5N1 किंवा अशा प्रकारच्या इन्फ्ल्युएंझा विषाणूमुळे विविध प्रकारच्या पक्षांमध्ये होत असतो. भारतात या रोगाचा शिरकाव 2006 साली प्रथम झालेला होता, तेव्हापासुन दरवर्षी स्थलांतर करणाऱ्या पक्षाद्वांरे या रोगाचा फैलाव व प्रादुर्भाव भारतातील कुठल्या ना कुठल्या भागात आढळून येत आहे. मात्र अद्याप देशात या रोगामुळे एकही व्यक्ती बाधीत झाल्याचे आढळून आलेले नाही. भारतीय खाद्य संस्कृतीत निट शिजवून अंडी व मांस याचे सेवन केले जाते व बर्ड फ्ल्यु हा विषाणु 70 डिग्री सेंटीग्रेड तापमानात 3 सेंकदात निष्क्रिय होत असल्याने निट शिजविलेली अंडी व मांस मानवी सेवानास पुर्णपणे सुरक्षीत आहे. बर्ड फ्ल्यु रोगाचा फैलाव पक्षांमध्ये वाढू नये याकरीता पशुसंवर्धन विभागाने रोग नियंत्रणाकरीता सर्व उपाययोजना केल्या आहेत. यात मुख्यत्वेकरून पुढील गोष्टींचा समावेश आहे.

प्रत्येक तालुक्यात पक्षांमध्ये होणाऱ्या असाधारण मर्तुकीकडे लक्ष ठेवून त्याबाबत अहवाल घेतल्या जात आहे. कावळे,पोपट,बगळे व सर्व स्थलांतरीत पक्षांच्या असाधारण पक्षांच्या मर्तुकीवर पशुसंवर्धन विभागासोबतच वनविभाग, सिंचाई विभाग त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवल्या जात आहे. ब्लिचींग पावडर वापरून प्रत्येक गावात निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोल्ट्री शेडचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 2% सोडीयम हायपोक्लोराईड पंचायत व आरोग्य विभागाद्वारे सर्व तालुक्यांना उपलब्ध करून दिले आहे.

बर्ड फ्ल्यु रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्व कुक्कुट व्यावसायीक, किरकोळ व घाऊक विक्रेते, कुक्कुटपालक व केंद्रचालक व परिसरातील कुक्कुट पक्षांचे शेतकरी वर्ग यांना विशेष सुचना करण्यात येते की, सर्व प्रकारच्या जिवाणु व विषाणुंना नष्ट करण्याकरीता धुण्याचा सोडा, Na2 Co3 सोडीयम काब्रोनेट यांचे एक लिटर पाण्यांमध्ये 7 ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करून कोंबड्यांचे रिकामे खुराडे, रिकामे पोल्ट्री शेड, खाद्याच्या खोल्या, पोल्ट्री फॉर्मचा परिसर, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षांचा वावर असणाऱ्या परिसरात फवारणी करवी. परत दर सात दिवसांनी फवारणी करावी. अशा प्रकारे आपल्या विविध पक्षांचा बचाव करण्यास मदत होईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अे.एन. सोमनाथे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here