कटाक्ष:राजकारण्यांना सर्वच माफ? जयंत माईणकर

0
453

कटाक्ष:राजकारण्यांना सर्वच माफ? जयंत माईणकर

All are equal but some are more equal!
सर्व समान आहेत परंतु काही अधिक समान आहेत! अमेरिकन पत्रकार विचारवंत जॉर्ज ऑरवेल यांचं समाजातील असमानतेवर बोट ठेवणारं हे वाक्य मला नेहमी आठवत. त्यातही जेव्हा न्याय प्रक्रियेत किंवा कायदा अमलात आणत असताना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींना झुकत माप मिळत तेव्हा तर या वाक्याची प्रकर्षाने जाणीव होते. अफेडीव्हीट किंवा प्रतिज्ञापत्रात किंवा सरकारदरबारी चुकीची अथवा खोटी माहिती देऊ नये . आणि तशी चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण असं असलं तरीही शिक्षण आणि विवाह याविषयी माहिती लपविण्याच्या घटना सर्वश्रुत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विधानसभेच्या एकूण चार निवडणुका लढवताना व्यक्तिगत माहिती लिहिताना पत्नीचं नाव लिहिणं टाळलं. मात्र२०१४ ला लोकसभा निवडणुकीत , निवडणूक आयोगाने चूकीची माहिती दिल्यास निवडणूक रद्द होऊन पुन्हा लढवता येणार नाही ,अशी तंबी भरल्यामुळे असेल, नरेंद्र मोदींना बनासकाठा या गावात राहणाऱ्या आणि पेशाने शिक्षिका असणाऱ्या आपल्या पत्नीची जसोदाबेनची आठवण झाली. आधी ही माहिती का लपवली या मुद्द्यावर एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने आता एफआयआर फाईल होऊ शकत नाही असा निर्णय दिला.
एकेकाळी देशाच्या मानव संसाधन विकास मंत्री (म्हणजे शिक्षण खात) राहिलेल्या स्मृती मल्होत्रा इराणी यांनी आपलं शिक्षण 12वी पासून परदेशी विद्यापीठातील पदवीपर्यंत अस सांगितले आणि शेवटी त्यांच्या शिक्षणाविषयी खरी माहिती देणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील एका कर्मचाऱ्यास निलंबित व्हावं लागलं.२००४ साली राज्यसभेत खासदार बनताना आपलं शिक्षण बी ए लिहीणार्या ‘बहू’ला २०१४ साली अमेठीत राहुल गांधी यांच्याविरुद्ध लढताना असा साक्षात्कार झाला की त्यांचं शिक्षण केवळ 12वी पास असून बी कॉम पार्ट वनला त्यांनी प्रवेश घेतला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आपण पदवी मिळवलेली नाही हे लिहिलं. कायद्याचा विचार केल्यास या दोघांनीही केलेल्या चुकांबद्दल यांच्या सर्व निवडणुका रद्द करून त्यांच्यावर कायदा मोडल्याबद्दल कारवाई केली पाहिजे. पण इथेच जॉर्ज ऑरवेलच वाक्य समोर येत आणि स्वतःची पत्नी विसरणारे पंतप्रधान महिला विकास या विषयावर भाषण द्यायला लागतात तर १२ वी पास स्मृती जेएनयुत विद्यार्थी शिकत नसून देशद्रोही बनतात असा जावईशोध लावतात. या दोघांनी केलेली चूक एखाद्या सामान्य माणसाच्या हातून घडली असती तर त्याला मात्र जेलची हवा खावी लागली असती.

पण हे सर्व आज आठवायचं कारण गेले आठ दिवस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून झालेली दोन मुले यांच्यामुळे महाराष्ट्राच राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघाल आहे.
अर्थात बलात्कारासारखा आरोप होऊनही आणि राजश्री नावाच्या पहिल्या पत्नीपासून तीन मुली असताना विवाहबाह्य संबंधातून करुणा शर्मा या स्त्रीपासून एक मुलगा आणि एक मुलगी यांचा बाप बनणाऱ्या मुंडेंचे मंत्रिपद शाबूत आहे. म्हणजे पुन्हा एकदा जॉर्ज ऑरवेल खरा ठरला. धनंजय मुंडेंनी निवडणूकीच्या घोषणापत्रात आपल्याला तीन मुली आहेत कि पाच मुलं आहेत असा उल्लेख केला आहे हाही एक प्रश्नच आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यात इतर दोन मुलांचा उल्लेख नाही.म्हणजेच मुंडेंनी चुकीची माहिती दिली. अर्थात आम्हाला सोडून गेलेला ‘धनुदादा’ कसा सापडला म्हणून संस्कृतीनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला जास्त आनंद होण्याची गरज नाही. कारण त्यांच्या पक्षाचे माजी खासदार आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी निवडणूक लढताना पत्नी म्हणून प्रकाश कौर यांचं नाव लिहिलं होतं.त्यांना प्रथम पत्नीपासून दोन मुलं आणि दोन मुली तर द्वितीय पत्नी हेमा मालिनीपासून दोन मुली आहेत. मात्र माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रनी लढवलेल्या एकमेव निवडणुकीत आपल्याला द्वितीय पत्नीपासून दोन मुली असल्याचा उल्लेख केला नव्हता.धर्मेंद्र निवडून आले. त्यावेळी हेमा मालिनी राज्यसभेत होत्या. हिंदू असून दुसर लग्न करण आणि दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलींची माहिती लपविणे या चुका कायदेमंडळात कायदे करणाऱ्या या सेलेब्रिटी जोडप्याकडून घडल्या आहेत. आणि समाजात सभोवती नजर टाकल्यास हिंदू पत्नी कायद्याचं खुलेआम उल्लंघन करून दोनहुन जास्त मुलं असणारे आणि विविध क्षेत्रात महत्त्वाची पद भूषविणारे अनेक महाभाग आढळतात. एकेकाळी बेकायदेशीर मानल्या जाणाऱ्या विवाहबाह्य संबंधांना आता कायदेशीर संरक्षण आहे. विवाहित असताना विवाहबाह्य संबंध आता बेकायदेशीर नाहीत. ते अनैतिक असतील.किंवा विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेली अपत्य अनौरस नाहीत. त्यातच डीएनए च्या शोधाद्वारे विज्ञानाने लक्षणीय झेप घेतल्याने कुठलाही बाप मुलाच पितृत्व नाकारू शकत नाही.संघ परिवार मुस्लिम समाजाच्या चार बायका यावर टीकास्त्र सोडत त्याच्यामुळे त्या समाजाची संख्या बहुसंख्य समाजातून जास्त वेगाने वाढत आहे असा गोबेल्स प्रणित प्रचार करत असतो. पण सभोवताली नजर टाकली तर बहुसंख्य हिंदू समाजातील अनेकांनी दोन किंवा त्याहून जास्ती वेळा लग्न करून ते चार पाच मुलांचे बाप बनलेले दिसतील. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कोणाही स्त्री अथवा पुरुषाने आपल्या सर्व शरीरसंबंधातून दोनहून जास्त मुलांना जन्म देऊ नये असा कायदा केल्यास जास्त सयुक्तिक होईल.
राहता राहिले धनंजय मुंडे! त्यांच्या विवाहबाह्य अपत्यांबद्दल निवडणूक आयोग कारवाई करेल ही अपेक्षा! पण आधीची मोदी आणि स्मृतीची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाईची शक्यता नाहीच! बलात्काराच्या आरोपावरून खर तर मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा. एकेकाळी पवारांचे निकटवर्ती डॉ पदमसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप झाला होता. ते अटकेतही होते.पण पक्षाने त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही.पुन्हा एकदा जॉर्ज ऑरवेल.
जगाचा विचार केला तरीही राजकारण्यांना सर्वच माफ असत अस दिसत. अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व जॉन केनेडी यांचे बहुचर्चित कामजीवन किंवा बिल क्लिंटन मोनिका लेविन्स्की अफेअर होऊनसुद्धा केनेडी आणि क्लिंटन आपल्या पदावर कायम राहिले. मात्र अमेरिकेचे सीआयए डायरेक्टर डेव्हिड पेट्रीयस याना पॉला ब्रॉडवेल या त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहीणार्या महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी राजीनामा द्यावा लागला. म्हणजेच राजकारण्यांना सर्व काही माफ असत अस दिसत.जॉर्ज ऑरवेलच वाक्य सगळीकडेच त्रिकालाबाधित सत्याप्रमाणे लागू पडत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here