देवाडा बुज.येथिल नाल्यावरील पुल देत आहे अपघातास निमंत्रण

0
478

💥देवाडा बुज.येथिल नाल्यावरील पुल देत आहे अपघातास निमंत्रण

💥 सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

💥ठेकेदारावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

रस्तामार्ग यांवर येणारे विविध अडथळे पार करण्यासाठी बांधलेली संरचना (Structure) म्हणजे पूल होय. नाले, ओढे, नद्या, दऱ्या, सरोवरे, खाड्या, व आडवे  रस्ते असे मार्गात येणारे विविध प्रकारचे अडथळे ओलांडण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या पुलांचा वापर करण्यात येतो. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज.आणि जुनगाव या संपर्क मार्गावर वैनगंगा नदीच्या उपप्रवाहाच्या लगत नाला असून या नाल्यावर दोन वर्षापूर्वी भूमिगत बंधारे टाईप बुडीत होता. या पुलामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यावर पूल पाण्याखाली येऊन रहदारी ठप्प होत होती. ही अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मुल ,यांच्या देखरेखीखाली या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात आला. मात्र या वर्षीच्या पुराणे या पुलाची पार ऐसीतैसी करून ठेवली. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे भगदाड पडून पन्नास ते शंभर फूट लांब खड्डे पडले होते. सविस्तर बाब वर्तमानपत्राच्या माध्यमातून लक्षात आणून दिल्यावर संबंधितांनी तात्काळ लक्ष घालून रहदारीस रस्ता तयार करून दिला.मात्र रस्ता तयार करताना गिट्टी मुरुमाऐवजी केवळ आणि केवळ पुराने वाहून आलेला गाळ या भगदाळांमध्ये टाकल्यामुळे हा गाळ रहदारीस अडथळा ठरत आहे. या ठिकाणावरून दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घालूनच तेवढे अंतर पार करावे लागत आहे.येथे कधीही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. दुर्घटना घडण्याच्या आधी संबंधित विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूचा गाळ काढून गिट्टी व मुरूम टाकून रस्ता मजबूत करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

पुलाचे काम अर्धवट आहे. तरीही याकडे संबंधित विभागाचे व ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मुल चे अभियंता श्री. वसुले यांचे या बाबींकडे अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केला आहे.
या विभागाच्या वतीने घोसरी फाटा ते जुनगाव पर्यंत जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावर वृक्षारोपण रस्त्याच्या दोन्ही कडेला करण्यात आले. मात्र हे वृक्ष कोणाच्याही देखरेखीत व संरक्षणात नसल्यामुळे या रस्त्यावरील एकही वृक्ष जगलेले आढळत नाही.याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग मुलचे अभियंता श्री वसुले असल्याचाही आरोप जीवनदास गेडाम यांनी केलेला आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात लाखो रुपयाचा गैरप्रकार झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.

घोसरी फाटा ते जुनगाव या रस्त्यावर अनेक छोट्या पुलांचे निर्माण करण्यात आले, व येत आहेत .मात्र हे सर्व बांधकाम अत्यंत निकृष्ट होत असून संबंधित विभागाचे अभियंता फिरकतांना दिसले नाही. करोडो रुपये खर्च करून सदर रस्ता बांधकाम करण्यात येत आहे याकडेही संबंधित विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे ठेकेदार मनमानी कारभार आणि निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांस लक्षात आणून देऊनही कामात सुधारणा झालेली दिसत नाही. डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here