कटाक्ष:दोन जातींचा देश! भक्त आणि देशद्रोही! जयंत माईणकर

0
338

कटाक्ष:दोन जातींचा देश! भक्त आणि देशद्रोही! जयंत माईणकर

अखंड भारताचं स्वप्न दाखवणार्या संघ परिवाराने मोदी भक्तीच्या नावाखाली त्यांच्या भाषेतील ‘खंडित’ भारतातील जनतेच्या दोन जाती तयार केल्या आहेत. त्यातील एक जात म्हणजे मोदी भक्त ज्याला काही द्रष्टे लोक चक्क ‘अंध भक्त;’ म्हणतात तर दुसरी जात म्हणजे ‘देशद्रोही’!आणि या दुसऱ्या जातीला कालानुरूप डावे, माओवादी, अरबन नक्षलवादी, अतिरेकी आणि आता चक्क खलिस्तान समर्थक अस नामाभिधान शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान संघ परिवार आणि भाजपद्वारे देण्यात आलं. हे मोदी भक्त इतके कट्टरपंथी आहेत की मोदी विरोधी शब्द सुद्धा ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आपली मोदी भक्ती सिद्ध करण्यासाठी हे भक्त मोदी विरोधी असलेल्या नातेवाईकांना बहिष्कृत करतात. व्हाट्सअप्प ग्रुपमधून काढून किंवा फेसबुकआणि अन्य सोशल मीडियातुन ‘अनफ्रेंड’ करून! हा नव्या बहिष्कृत भारताचा प्रकार! ही भक्तमंडळी प्रथम ग्रुपवर उत्तरे देऊन किंवा भारतावर सातव्या शतकात हल्ला करणाऱ्या पहिल्या मुस्लिम हल्लेखोरांपासून म्हणजे महंमद बिन कासीमपासून तर अगदी काश्मीरमध्ये घडणाऱ्या अतिरेकी कारवायांपर्यंत सर्व घटनांना केवळ नेहरु -गांधी परिवार आणि काँग्रेस कशी जबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात.शेवटी उत्तरे देता आली नाही की आपला ग्रुप राजकारणापासून दूर ठेवण्याचा मौलिक मध्यमवर्गीय सल्ला देतात. आणि तरीही हा मोदी विरोधक जर थांबला नाही,तर त्याला चक्क ग्रुपमधून बहिष्कृत करतात हा स्वानुभव! आणि हे सर्व आज आठवण्याच कारण देशाला आणि जगातील सुमारे २० देशांना गहू, तांदुळ पुरवणारे पंजाब हरियाणातील एक कोटीहून जास्त शेतकरी आपल्या एक लाख ट्रॅकटरसह केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून ठाण मांडून बसले तेव्हा त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, देशद्रोही म्हणेपर्यंत या सरकारमधील मंत्र्यांची मजल गेली. अर्थात प्रत्येक हुकूमशहाप्रमाणे आपल्या विरोधी असलेल्या लोकांना देशद्रोही म्हणण्याची परंपरा इथेही कायम राहिली. कुठे १९६५ साली स्व लालबहादूर शास्त्री यांनी दिलेली जय जवान जय किसान ही घोषणा आणि कुठे अख्ख्या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची गेल्या सहा वर्षांपासून विकसित झालेली नवी देशभक्ती. गुजरातसह संपूर्ण देशातून हरवलेला विकास अखेर इथे सापडला म्हणायचा! आपल्या राज्यातून गुजरातमधून तडीपार होणारे अमित शहा देशभक्त तर आपण पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करणारा शेतकरी देशद्रोही अस न पटणार समीकरण.त्यातूनही सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे’आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र आम्ही केलेल्या कायद्यातील एकही कलम मागे घेणार नाही’अशी दरपोक्ती. सरकार आपल्या कायद्यात जर कुठलाही बदल करण्यास तयार नसेल तर चर्चा करण्यास अर्थ तो काय?ही तर ढळढळीत लोकशाहीतुन जन्माला आलेली हिटलर प्रणित हुकूमशाही.शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच काही महिने आधी शाहीन बाग या दिल्लीतील परिसरात अल्पसंख्याक समाजातील महिलांनी शांततामय आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळीही त्या आंदोलनावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. कोरोनामुळे उदभवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत आंदोलन थांबविण्यात आलं.डिसेंबर महिन्यात शांततापूर्ण मार्गाने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनालाही देशद्रोही म्हटल्या गेलं. म्हणजे बाबरी मस्जिद पाडून त्याजागी रामाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेल्या आंदोलनात दहा हजार लोकांचा बळी गेला तरीही ते आंदोलन हे देशभक्तीच प्रतिक. मात्र सीएए, एनआरसी या कायद्याविरुद्ध शांततापूर्ण पद्धतीने आवाज उठवणारा अल्पसंख्याक समाजआणि देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा देशद्रोही! शाहीन बाग आणि शेतकर्यांच्या आंदोलनाला तथाकथित रित्या पुरवल जाणार आर्थिक पाठबळ तसच पुरवले जाणारे
बिर्याणी पासून पिझ्झा पर्यंतचे सर्व पदार्थ याच रसभरीत वर्णन संघ परिवार आणि भाजपच्या अत्यंत क्रियाशील आय टी सेलद्वारे सोशल मीडियावर वारंवार हमर केलं जातं असतच! हिटलरनंतर एक दिवसासाठी चान्सेलर होऊन
आत्महत्या करणाऱ्या जोसेफ गोबेल्स च्या नितीप्रमाणे. मात्र ही मंडळी कधीही लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रथयात्रेच्या वेळी कारसेवकाना खाद्य पदार्थ कोणी पुरवले, तो पैसे कोणी पुरवला, त्याच्यावर एकूण किती खर्च झाला अशा प्रश्नांची कधीही उत्तरे देणार नाहीत. कारण यामूळे त्यांचीच काळी बाजू जगासमोर येईल. अयोध्येत १९९० आणि १९९२ अशा दोन वेळा देशभरातून* *पोचलेल्या कारसेवकांचा *खर्च, त्यांचं अन्नपाणी कोणी पुरवलं हाही एक संशोधनाचाच विषय आहे. पण स्वयंघोषित देशभक्तांच्या दृष्टीने कारसेवक
म्हणजे तर देशभक्त! मराठीत एक म्हण आहे स्वतः च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र दिसत! त्या म्हणीच प्रत्यंतर इथे येत. जेएनयू मध्ये किती कंडोम वापरले जातात किंवा कशा देशद्रोही घोषणा दिल्या जातात याच रसभरीत वर्णन भर संसदेत करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आपला एकही आरोप कधीही सिद्ध करता आला नाही. मात्र ९७० कोटी रुपयांच्या नव्या संसद भवनाच भूमिपूजन करण्यात आलं.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना आणि जूने संसद भवन असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनावर खर्च करण्यास तयार असतात भलेही त्या संसदेत ते स्वतः किती बोलतात हाही एक संशोधनाचा विषय आहे.
एकूणच अखंडतेची भाषा बोलत कुटुंबापासून तर देशापर्यंत भक्त आणि देशद्रोही अशा दोन जाती निर्माण करणाऱ्या भाजप संघ परिवाराचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here