दारूबंदी की दारू मुक्ती !
🟣🟪गडचिराेली🟪🟣☀️✍️विदर्भात अतिदुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणां-या गडचिराेली जिल्ह्यातील सुपरिचीत जेष्ठ लेखिका कुसुम अलाम यांनी दारुबंदी की दारुमुक्ती या ज्वलंत विषयावर खास वाचकांसाठी एक लेख शब्दांकित केला आहे ताे येथे देत आहाे ! 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🟣🟢🌀खरेतर दारू हा विषयच विश्वव्यापी आहे. यावर जेवढे बोलावे ज्या अंग प्रत्यंगाने वर्णन करावे तेवढे थोडे आहे. ही दारू म्हणजे काय? असे प्रश्न कोणाला विचारावे असे नाही एवढे ते घराघरात पोहोचलेले आहे. प्रत्येक घराच्या बाजूला दुसऱ्या घरात दारू पिणारे सापडतात.अनेक घरातील महिला त्रस्त आहेत.रासायनिक दारु व तीही न मिळाल्याने लकडा पाँलिस पिऊन सामुहिक जीव गमावले गेले,संसार उध्वस्त झाले. अशी या देशात अवस्था झाली आहे. हा महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. व गुजरात ही महात्मा गांधीची जन्मभूमी आणि वर्धा ही कर्मभूमी.या तिन्ही ठिकाणची सरमिसळच म्हणावी लागेल. महात्मा गांधींनी नशामुक्तीचे प्रयोग केले. किंवा गांधींना पुढे ठेवून नशा मुक्ती किंवा दारू मुक्ती व्यसनमुक्तीचे कार्य केले जाते. तेव्हा प्रचंड यातना होतात. दारू इंग्लिश, गावठी, देशी, हातभट्टीची, गुळंबा ही नावे ऐकून आहोत. व्हिस्की,ब्रांडी,रम, हंडिया,पहिल्या धारेची, पिवर मोहाची, कडक असेही बोलले जाते. द्राक्षे, मोह, तांदूळ, काजू इत्यादींपासून दारू बनवली जाते. आदिवासी भागात ताडाची झाडे आहेत. त्या झाडांची ताजी ताडी ही अनेक विकारांवर गुणकारी म्हणून प्राशन केली जाते. शिळी झाल्यावर मात्र ती आंबट बनते आणि नशा युक्त होते. दारू ही देवादिकांना पासून चालत आलेली आहे असे पिणाऱ्या कडून बोलले जाते. बाई आणि बाटली मर्दाचे शौक असल्याचे आंबटशौकीन बहाणे आहेत. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे भैरवनाथ देवाचे दारु पाजुन पूजन होते. तेथे खुलेआम दारु विक्रीसाठी ठेवली असते. प्रत्येक भाविक हा दारू विकत घेऊन भैरव नाथाच्या मुखात रिचवतो. ती दारू कुठल्या मार्गाने कुठे जाते हे कळत नाही. दारु वर नाटक सिनेमे निघाले एकच प्याला चे तळीराम वाढले. शराबी बनवून पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या. दारूचे व्यसन हे घातक आहे असे सांगितले, तर तो पिणाराच म्हणतो की, अल्कोहोल हे प्रत्येक औषधात वापरतात,आम्ही ते थेट पोटात टाकतो. ते जग जिंकल्याच्या अविर्भावात बोलतात. आदिवासींच्या बाबतीत तर एक वेगळाच भ्रम, अथवा गैरसमज समाज मनावर बिंबवला गेला आहे. आदिवासी आणि दारू हे समीकरणच बनले आहे. आदिवासींचे कोणतेही पारंपारिक कार्य दारुशिवाय होतच नाही.त्यामुळे आदिवासींना काही प्रमाणात दारू पिण्याची व काढण्याची मुभा शासनाकडून मिळालेली आहे. यावरून शासनाला आदिवासींची किती कळकळ आहे हे स्पष्ट दिसते.(हसावी की रडावे) खरे तर आदिवासी दैवतांचे पारंपारिक पूजन केले जाते तेथे मोह फुलाने पूजन होते. हे मोहाचे फुल वर्षातून एकदाच येते. या झाडाचे वैशिष्ट्यच आहे माणसाच्या हर कमी आहे. त्याला कल्पवृक्ष म्हटले जाते. जंगल आधारित जीवन जगणारा आदिवासी मोहाच्या झाडाला कल्पवृक्ष मानतो. व त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व देतो. पूजेमध्ये त्याला स्थान देतो. आदिवासींचे देव मोहाच्या झाडावर राहतात असे म्हणणे म्हणजे,तो किती गरजेचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा औषधाप्रमाणे वापर केल्या जातो. तो गुणवैशिष्ट्य पूर्ण झाड आहे यास्तव त्याला मान आहे. पारंपरिक पूजन करताना सगेसोयरे एकत्र येतात तेव्हा मातीचे अथवा धातुचे भांड्यात पाणी ठेवतात त्यात मोहा फुले टाकतात. वरून कापड झाकलेले असते. ज्या वेळी पुजन करुन नैवेद्य दिल्या जाते तेव्हा पाणी वापरतात ते पाणी देतात. ते देताना कापडावर पैसे टाकण्याची प्रथा आहे. (विधी) ते फुकट दिले जात नाही. यावरून मोहाचे महत्त्व लक्षात येते. यावरून चुकीचा अर्थ काढून भ्रम पसरविण्यात आला की, दारूशिवाय आदिवासींचे पूजन होत नाही. खरे तर ते मोहा शिवाय होत नाही असे आहे. अर्थात आदिवासी पुरुषांना तर ‘पीने वालो को पीने का बहाना चाहिये’ असेच म्हणावे लागेल. कारण अनेक पूजाविधीमध्ये आदिवासी महिलांचा थेट सहभाग नसतो. आदिवासी परंपरांचे व्यापारीकरण झालेले आहे. आदिवासी भागात, ग्रामीण भागात, झोपडपट्टी भागात दारूचा प्रसार वेगाने होण्यामागची कारणे हे व्यापार व सत्ता यांच्याशी निगडित आहे. व्यापारी डबल गेम खेळतात.मजुर घरी जाण्याच्या तयारीत असताना या व्यापाऱ्याच्या घरात दारू असते ती त्या मजुराना जागेवरच प्राप्त होते. अर्थात दारू पाजून त्यांचे शोषण केले जाते. दिवसभराची संपूर्ण रोजीरोटीची कमाई घरापर्यंत न पोहोचता व्यापाराच्या घरातच राहते. अशात-हेने व्यसन हळूहळू वाढते, पिणारे मग साथी सहवासाने एकेक जुळू लागतात. गडचिरोली दारूबंदी जिल्हा आहे. आदिवासींना दारू पिण्याचे व काढण्याचे लायसन दिले जाते. त्याचा गैरफायदा सावकार, व्यापारी व शासन घेत आहे.महिलांना पुढे करून मोठ्या प्रमाणात गोरखधंदा सुरू आहे . उत्पादन शुल्क खाते व पोलिस खाते हे कोणाचे तरी खातेदार आहेत का? असे वाटते! अनेक राजकीय मंडळींना सत्तेत येण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी व ती विस्तारित करण्यासाठी दारू हे माध्यम झालेले आहे. कालचे गल्लोगल्लीतील नेते दारूमुळे धनदांडगे झाले.राजकिय पाठबळ मिळाले तर दारुसह अनेक अवैध जोडधंदे सर्रास पणे करता येते. 2013 महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभाग यांचे व्यसनमुक्ती पुरस्कार मी सिनेकलाकार सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते स्वीकारत असतानाच, डॉ.राणी बंग म्हणाल्या, कुसुमताई चे कार्य खूप छान आहे. मला पुरस्कार नको अशी मी वारंवार विनंती केली होती. परंतु समाजकल्याण विभागाने दिलगिरी व्यक्ती करत म्हणाले की, प्रसिद्धी माहिती संचालनालयाकडे तुमचे नाव गेले आहे आता काहीच करता येत नाही. ताई आमची अडचण करू नका आणि दारूबंदी जिल्ह्यातील मी पुरस्कार स्वीकारताना मनातून खजील झाले होते. माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे नेहमी आदिवासींना व सर्व जनतेला दारूच्या विषय गंभीर होऊन सतत मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करावी. दारूबंदी की दारू मुक्ती यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
🟣☀️संकलन -किरण घाटे 🟣रसिका ढाेणे☀️वराेरा