कटाक्ष:कोरोना आणि माध्यम! जयंत माईणकर

0
393

कटाक्ष:कोरोना आणि माध्यम! जयंत माईणकर

कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात १५ लाखहुन अधिक लोकांचा बळी घेतला आहे असं नव्हे तर अनेक व्यवयासायांचा सुद्धा बळी घेतला आहे. अनेक व्यवसाय बदललेल्या परिस्थितीनुसार स्वतः ला बदलत अथवा व्यवसाय चालविण्याच्या खर्चात कपात करत कसेबसे टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच
व्यवसायांवर गाज आली आहे. पालकांकडे पैसे नसल्यामुळे विद्यार्थी खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेताना दिसत नाहीत त्यामुळे खाजगी महाविद्यालयांचे पगार खोळंबले आहेत, हॉटेलमध्ये गिऱ्हाईक कमी असल्यामुळे वेटर्स ची संख्या कमी होत आहेआणि असाच एक आघात होत आहे वृत्तपत्रांवर! देशातील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात १८२२ साली झाली . त्या गुजराती वृत्तपत्राच नाव ‘मुंबई समाचार’. दक्षिण मुंबईत हुतात्मा चौकाच्या बाजूच्या गल्लीत हे वृत्तपत्र आजही प्रकाशित होत. तर १८३६ साली आजच्या टाइम्स ऑफ इंडीयाचा जन्म वेगळ्या नावानी झाला. जवळपास गेली दोनशे वर्षे वृतपत्र आपल्या जीवनाचा हळूहळू अविभाज्य घटक बनत गेली.या वृत्तपत्रांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दा पासून,काँग्रेसची स्थापना, स्वातंत्र्य, १९६२, ६५,७१ ची युद्धे, आणीबाणी, बाबरी विध्वंस इतकेच नव्हे तर चक्क कोरोनाच्या संसर्गाची माहितीसुद्धा जगाला दिली. याच दरम्यान दृक्श्राव्य माध्यम अर्थात टीव्ही माध्यमे वाढत होती . तरीही वृत्तपत्रांनी आपलं अस्तित्व टिकवून धरलं. पण लॉकडाऊननंतर म्हणजे सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतरसुरू झालेल्या वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणात बदल सुरु झाले. व्हाट्सअप्प, युट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमांद्वारे आणि टी व्ही द्वारे मिळणाऱ्या बातम्या किंवा वृत्तपत्रांच्या डिजिटल एडिशन हेच लॉकडाउनच्या काळातील माहितीचे स्रोत होत. पण त्यानंतर एकूणच वृत्तपत्र व्यवसायाला उतरती कळा लागली. शहरी वाचकांना डिजिटल माध्यमांची सवय अंगवळणी पडू लागली. वृत्तपत्र हासुद्धा एक व्यवसाय आहे. आणि आपल्या व्यवसायात फायदा मिळविणे हे वृत्तपत्र मालकांच ध्येय असणं साहजिक आहे. कोरोनाच्या काळात वृत्तपत्राच्या खपावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामूळे साहजिकच त्याचा परिणाम जाहिरातींवरही झाला. वृत्तपत्रांना जाहिराती कमी मिळू लागल्या. आणि सहा वर्षात मीडियाशी एकदाही न बोलणाऱ्या आणि मीडियाशी विळ्या -भोपळ्याएवढं सख्य असणाऱ्या मोदी सरकारने संधी साधून जाहिरातींवर अधिक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. संत तुकाराम म्हणाले होते ‘निंदकाचे घर असावे शेजारी’! पत्रकारांचे काम निंदाजाचे! पण मोदींना निंदा तर सोडाच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणंसुद्धा आवडत नाही. खप आणि जाहिरातींमधील मोठा फटका बसल्याने अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी आपापल्या एडिशन्स बंद केल्या. त्यातीलच एक वृत्तपत्र म्हणजे मुंबई मिरर आणि पुणे मिरर.२००५ साली देशाच्या आर्थिक राजधानीत एकदम तीन वृत्तपत्रांनी पदार्पण केल. डीएनए, हिंदुस्थान टाईम्स आणि मुंबई मिरर!आज त्यापैकी फक्त एक वृत्तपत्र हिंदुस्थान टाइम्स अस्तित्वात आहे. आपल्या इतर पुरवण्या बंद करत असतानाच टाइम्स वृत्तपत्रसमूहाने मिरर सारखे वृत्तपत्र बंद केलं. अर्थात कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर बेरोजगारीची किंवा कमी पगारावर काम करण्याची पाळी आली आहे. पण त्यात मी तरी वृत्तपत्रांच्या मालकांना दोष देणार नाही. कारण जर खपआणि जाहिरातींचे दर कमी झाल्यानंतरही मालकांनी स्वतः तोटा सोसून वृत्तपत्र चालू ठेवण्याचा आग्रह करणे सर्वस्वी चूक आहे. आर्थिक दृष्ट्या वृत्तपत्र तोट्यात चालत असताना ती चालू ठेवलेच पाहिजेत असा आग्रह धरणाऱ्या वृत्तपत्र संघटनांच्या मी संपूर्ण विरोधात आहे. तोट्यात चालणारा व्यवसाय केवळ त्या मालकांना एकेकाळी व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वस्त दरात लिजवर सरकारी जमिनी मिळाल्या अथवा जाहिराती मिळतात म्हणून सुरू ठेवावी अस म्हणणं हे वृत्तपत्र मालकांवर संपूर्ण अन्याय करणार आहे. वृत्तपत्र तोट्यात असतील तर त्यांच्या स्वरूपात बदल करण्याचा अथवा ते बंद करण्याचा अधिकार नि:संशय मालकांचा आहे. पण डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या पत्रकारांच्या संघटना नेमक्या याच वेळी ‘नियमानुसार काम” किंवा “पत्रकारांना वेतन आयोगाच्या *तरतुदीनुसार पगार द्या”, अशा मागण्या करतात. वास्तविक पाहता *माध्यमांमध्ये पत्रकारांच्या नियुक्त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होत असताना अशा मागण्या *करणं अवाजवी नव्हे तर माध्यम व्यवसायाला खिळ घालण्यासारखं आहे.
मला आश्चर्य याच वाटत की स्वतः कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच नोकरी करणारे पत्रकार वृत्तपत्र संघटनांच्या माध्यमातून मात्र आयोगाच्या तरतुदीनुसार पगार द्या अशी मागणी करतात. पत्रकारांवरील हल्ल्याचा अथवा धमकीचा निषेध करताना या संघटना ‘सिलेक्टिव्ह’ असतात.आपल्या विचारांच्या पत्रकारांच्या बाबतीत अशा घटना घडल्यास त्याचा लगेच निषेध करणाऱ्या संघटना आपल्या विरोधी विचारांच्या पत्रकारांना धमक्या आल्यानंतर साधं निषेधाच पत्रकही काढण्यास टाळाटाळ करतात हा स्वानुभव! महानगरातील वृत्तपत्रांपेक्षा ग्रामीण किंवा अर्धनागरी भागातील वृत्तपत्रांची अवस्था तर अत्यंत बिकट.मला इथे आदराने नमूद करावंसं वाटत की स्वतःला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक झळ सोसूनही जिद्दीने श्री प्रकाशभाऊ पोहरे यांनी देशोन्नती वाचकांपर्यंत अगदी खेड्यापाड्यात पोहचेल यासाठी परिश्रम घेतले. कारण कोरोनाच्या नावाखाली वृत्तपत्रांच्या पानांची संख्या कमी करणारे अथवा इतर माध्यमांनी आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणारे मालकही मी अनुभवले आहेत. या पार्श्वभूमीवर देशोन्नतीच वेगळेपण उठून दिसत.एकूणच माध्यमांच्या या कठीण काळात मालकांना वेठीस धरून त्यांना दोष देण्यापेक्षा वृत्तपत्र संघटनांनी तरी वास्तविकता लक्षात घ्यावी ही अपेक्षा! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here