पट्टा पद्धतीने धानाची रोवणी केल्यास धान पिकाचे तुडतुड्यापासून व्यवस्थापन करुन चांगले उत्पादन घेता येते.
याकरिता सेंद्रीय खताचा, हिरवळीच्या खताचा, जैविक खतांचा व रासायनिक खतांचा, किटकनाशकाचा शिफारसीप्रमाणे योग्य प्रमाणात काळजी घेऊन वापर करावा. पट्टा पद्धतीने रोवणी केल्यास पट्ट्याची ३० ते ४० सेमी मोकळी जागा सोडण्यात येत असल्याने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. तसेच हवा खेळती राहत असल्याने तुडतुड्याच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो.
त्याचप्राणे मोकळ्या पट्ट्यातून पिकांचे निरीक्षण करणे, फवारणी करणे तसेच धान बिजोत्पादकांना भेसळ काढणे सहज शक्य होते. शेतकऱ्यांनी कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भात पिकाची पट्टा पद्धतीने रोवणी करण्यासाठी पुढे यावे. याकरिता शेतकऱ्यांनी लवकर येणार्या , मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची दोन रोपातील २५ सेमी व दोन ओळीतील २५ सेमी एवढ्या अंतरावर प्रती २ ते ३ रोप घेऊन दोरीच्या सहाय्याने सरळ रोवणी करावी.
तसेच १० ओळी सलग झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडावे किंवा १० फूट रोवणी झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडून पुन्हा रोवणीस सुरुवात करावी.पट्टा पद्धती शेतकऱ्यांना परवडणारी असून उत्पादनात वाढ होत असल्याने भाताची रोवणी पट्टा पद्धतीने करण्याचे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक एन सी गाडेकर यांनी केले आहे.