अहमद पटेलजींच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला – विजय वडेट्टीवार

0
420

अहमद पटेलजींच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 25 नोव्हेंबर 2020 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेलजी यांच्या निधनाने एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे,  इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, अहमद पटेलजींच्या निधनाने देशाचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूनं सेवा केली आहे.  त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. अहमदजी  हे साधे गृहस्थ नसून, ते एक विद्वान राजकारणी होते. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते. मृदूभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचं जाणं हे पक्षासाठी नुकसान करणारं आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. पक्षासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. जेव्हा कुणाला पक्षात त्यांच्या मदतीची गरज भासायची त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून यायचे.  पक्ष त्यांचं योगदान विसरू शकणार नाही.

80 च्या दशकात अहमद पटेल भरूच इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत पक्षाचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले. 1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचं अध्यक्ष बनविण्यात आलं. 1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता, यावरून त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची कल्पना येवू शकते.

अहमद पटेलजींचे विराट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या निधनाचे दु:ख शब्दांमध्ये मांडता येणार नाही. दोन दशकं राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पटेलजी यांना राजकारणाच्या खाच खळग्यांची उत्तम जाण, पक्षातील घडामोडींचा गाढा अभ्यास… याच गुणांमुळे त्यांचं भारताच्या राजकारणातलं स्थान अढळ आहे. अहमद पटेलजीं त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे वडेट्टीवार  म्हणाले.  अहमदजी आज आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, विचार नेहमीच प्रेरणा देत राहील. या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here